प्रतिनिधी / सातारा :
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि अंधश्रध्दा, जादूटोणा कायद्याचे जनक विवेकवादी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या घटनेस शुक्रवारी आठ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने सातारा जिल्हा अंधश्रध्दा निर्मूलन समितीने शहरात सायकल रॅली काढून त्यांना अभिवादन करतानाच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या सुत्रधारांचा तपास त्वरित करण्याची मागणी केली. तर सोशल मीडियावर सातारकरांनी डॉ. दाभोलकर यांच्या आठवणी जागवत त्यांना ‘विचारांची लढाई, विचारांनी लढला, सत्यासाठी शेवटी आचाराने भांडला, तो भ्याड नव्हता, पळून गेला नाही आणि रणागंणी लढताना गळूनही गेला नाही’ अशा शब्दात आदरांजली वाहिली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त सातारा जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दाभोलकरांच्या खूनाच्या सूत्रधारांचा तपास त्वरित लावण्याबाबत निवासी जिल्हाधिकारी थोरवे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महा.अंनिस चे राज्य कार्यकारी समिती सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत एस. पोतदार, जिल्हा कार्याध्यक्ष वंदना माने, जिल्हा प्रधान सचिव हौसेराव धुमाळ, भगवान रणदिवे, राजेंद्र पवार, विलास भांदिर्गे आदी उपस्थित होते.