2021 मध्ये सर्व क्रिकेट प्रकारातील सातत्यपूर्ण योगदानाची पोचपावती
दुबई / वृत्तसंस्था
भारताची धडाकेबाज सलामीवीर स्मृती मानधना वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू पुरस्काराची मानकरी ठरली. 2021 मध्ये सर्व क्रिकेट प्रकारातील सातत्यपूर्ण कामगिरीच्या निकषावर तिने हा सन्मान पटकावला. रॅशेल फ्लिन्ट पुरस्काराची ती मानकरी ठरली. याशिवाय, वर्षातील सर्वोत्तम टी-20 महिला संघातही तिचा समावेश आहे. आयसीसीने सोमवारी सर्व पुरस्कार व वर्षातील सर्वोत्तम संघांची घोषणा केली.
स्मृती मानधनाने इंग्लिश प्रतिस्पर्धी टॅमी ब्यूमाऊंट, दक्षिण आफ्रिकेची लिझेले ली व आयर्लंडची गॅबी लुईस यांच्यावर मात करत सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू पुरस्कार संपादन केला. स्मृतीने यापूर्वी 2018 मध्ये देखील आयसीसी पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. त्यावेळी ती वर्षातील सर्वोत्तम महिला वनडे क्रिकेटपटू ठरली होती. सर्व क्रिकेट प्रकारातून सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा सन्मान प्राप्त करणारी ती दुसरी भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी अनुभवी जलदगती गोलंदाज झुलन गोस्वामीने 2007 साली हा सन्मान प्राप्त केला होता.
टी-20 क्रिकेट प्रकारात भारतीय संघाचे उपकर्णधारपद भूषवत असलेल्या स्मृतीचा पूर्ण वर्षातील फॉर्म लक्षवेधी ठरला. वास्तविक, 2021 चे वर्ष बरेच प्रतिकूल होते. पण, स्मृतीचा चिवट खेळ भारतासाठी विशेष महत्त्वाचा ठरला.
भारताला मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत 8 पैकी केवळ दोनच सामने जिंकता आले आणि योगायोग म्हणजे या दोन्ही लढतीत स्मृतीनेच सिंहाचा वाटा उचलला होता. दुसऱया वनडेत भारतीय संघाने 158 धावांचा यशस्वी पाठलाग केला, त्यात स्मृतीने नाबाद 80 धावा फटकावल्या. या विजयासह भारताने मालिकेत बरोबरी साधली होती. त्यानंतर शेवटच्या टी-20 सामन्यातही स्मृतीने नाबाद 48 धावांची बहारदार खेळी साकारली होती.
25 वर्षीय स्मृतीने नंतर इंग्लंडविरुद्ध अनिर्णीत राहिलेल्या एकमेव कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 78 धावांचे योगदान दिले. भारताने वनडे मालिकेत एकमेव सामना जिंकला, त्यावेळी त्यात तिचा 49 धावांचा वाटा महत्त्वाचा राहिला. त्यानंतर टी-20 मालिकेत तिने एकदा 15 चेंडूत 29 तर दुसऱयांदा अर्धशतकी खेळी साकारत आपला फॉर्म दाखवून दिला. मात्र, या दोन्ही लढतीत भारताला पराभव पत्करावे लागले.
अनुभवी स्मृती पुढे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतही उत्तम बहरात दिसून आली. तिने दुसऱया वनडे सामन्यात 86 धावांचे योगदान दिले. कसोटी पदार्पण नोंदवताना तिने शानदार शतक झळकावले व सामनावीर पुरस्काराची देखील मानकरी ठरली. नंतर शेवटच्या टी-20 सामन्यात तिने वर्षातील दुसरे टी-20 अर्धशतक झळकावले. मानधनाने भारताचा गुलाबी चेंडूवरील ऐतिहासिक पहिलावहिला कसोटी सामना आपल्या पहिल्या शतकाने गाजवला, तेही लक्षवेधी ठरले.
लिझेले वनडेत सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू
दक्षिण आफ्रिकेची लिझेले ली ही वर्षातील सर्वोत्तम महिला वनडे क्रिकेटपटू पुरस्काराची मानकरी ठरली. तिने 2021 मध्ये वनडे क्रिकेट प्रकारात सर्वाधिक धावांचे योगदान दिले. भारतात दक्षिण आफ्रिकेला 4-1 असा मालिकाविजय संपादन करुन देताना तिने 288 धावांची आतषबाजी केली. तिने एक शतक व 2 अर्धशतके झळकावली. शिवाय, मालिकावीर पुरस्कारही संपादन केला.
पुरुष गटात बाबर आझम, जो रुट, शाहिन आफ्रिदीला विविध पुरस्कार
आयसीसीच्या पुरस्कारांमध्ये बाबर आझम (वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटू), जो रुट (वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू) व शाहीन आफ्रिदी (वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू) यांचीही वर्णी लागली. शाहीन आफ्रिदी सर गारफिल्ड सोबर्स चषक पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने 2021 मध्ये सर्व क्रिकेट प्रकारातून 36 आंतरराष्ट्रीय सामन्यात 22.20 च्या सरासरीने 78 बळी घेतले.
27 वर्षीय बाबर आझमने 6 सामन्यात 67.50 च्या सरासरीने 405 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2-1 असा विजय संपादन केला, त्यावेळी दोन्ही विजयात तो सामनावीर ठरला होता. त्याने या मालिकेत 228 धावा जमविल्या.
पहिल्या वनडेत पाकिस्तानने 274 धावांचा यशस्वी पाठलाग केला, त्यावेळी आझमने शतक झळकावले. शिवाय, शेवटच्या वनडेत 82 चेंडूत 94 धावांची खेळी साकारली. पाकिस्तानने त्यावेळी प्रथम फलंदाजी करताना 320 धावांचा डोंगर रचला होता. इंग्लंडने पाकिस्तानचा 3-0 फरकाने धुव्वा उडवला, त्यावेळीही बाबर आझमने संघर्षपूर्ण फलंदाजी साकारली. त्याने 3 सामन्यात 177 धावा केल्या. मात्र, त्याच्या अन्य एकाही सहकारी फलंदाजाला मालिकेत अगदी 100 धावांचा टप्पाही सर करता आला नव्हता.
जो रुट वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू
2021 मध्ये इंग्लिश कर्णधार जो रुटने कसोटी क्रिकेटवर वरचष्मा गाजवताना कॅलेंडर वर्षात 1700 पेक्षा अधिक धावांचा विक्रम नोंदवला. कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांमध्ये मोहम्मद युसूफ व सर व्हीवियन रिचर्ड्स यांच्यानंतर तो केवळ तिसरा फलंदाज ठरला. मायदेशात, आशियाई खंडात, अनुकूल व प्रतिकूल स्थितीतही त्याने सातत्यपूर्ण योगदान दिले. गॅलेत श्रीलंकेविरुद्ध आणि चेन्नई व लॉर्ड्समध्ये भारताविरुद्ध रुटची खेळी लक्षवेधी ठरली. चेन्नईत त्यांची 218 धावांची खेळी मास्टरक्लास दाखवून देणारी होती. अगदी गोलंदाजीतही त्याने 14 बळी घेत आश्चर्याचा धक्का दिला. अहमदाबादेत त्याने 5 बळीचा पराक्रमही गाजवला. या गटात अश्विन, काईल जेमिसन व दिमुथ करुणारत्ने यांना नामांकन लाभले होते.
शाहीन वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू
पाकिस्तानचा सनसनाटी युवा गोलंदाज शाहीन आफ्रिदीने तिन्ही क्रिकेट प्रकारात भेदक मारा साकारत वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू पुरस्कार पटकावला. आयसीसी पुरुष गटातील टी-20 विश्वचषक गटातील त्याचा वेग व कौशल्य थक्क करुन जाणारे होते. त्याने वर्षभरात या छोटय़ा क्रिकेट प्रकारात 21 सामन्यात 23 बळी नोंदवले. कसोटी क्रिकेटमध्ये मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भेदक मारा साकारल्यानंतर त्याने झिम्बाब्वे, विंडीज व बांगलादेश दौऱयातही लक्षवेधी योगदान दिले. त्याने 9 कसोटीत 17.06 च्या लक्षवेधी सरासरीने 47 बळी घेतले.
पंच इरासमूस यांचा तिसऱयांदा सन्मान
दक्षिण आफ्रिकन पंच मरायस इरासमूस हे तिसऱयांदा वर्षातील सर्वोत्तम पंच पुरस्काराचा मानकरी ठरले. यापूर्वी 2016 व 2017 मध्येही त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला होता. 57 वर्षीय इरासमूस यांनी अलीकडेच भारत-द. आफ्रिका मालिकेतही पंच म्हणून काम पाहिले. त्यांनी 2021 मध्ये तिन्ही क्रिकेट प्रकारात मिळून 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचगिरी केली. यात टी-20 वर्ल्डकप फायनलचा प्राधान्याने समावेश होतो.