अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम : स्टीफानोस सित्सिपस, डॅनील मेदवेदेव्ह, रुबलेव्ह, मुगुरुझा यांचेही विजय, गॉफ, रुड, डिमिट्रोव्ह स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था /न्यूयॉर्क
ग्रीकच्या स्टीफानोस सित्सिपसने अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. वादळी पावसामुळे काही काळ सामने थांबवावे लागले होते. महिलांमध्ये जपानच्या नाओमी ओसाकाला पुढे चाल मिळाल्याने तिसऱया फेरीत स्थान मिळाले तर स्लोअन स्टिफेन्स, सिमोना हॅलेप, व्हिक्टोरिया अझारेन्का, गार्बिन मुगुरुझा, रशियाचा आंद्रेय रुबलेव्ह यांनीही तिसरी फेरी गाठली. कोको गॉफ, कॅस्पर रुड, बल्गेरियाचा ग्रिगोर डिमिट्रोव्ह यांचे आव्हान दुसऱया फेरीत संपुष्टात आले.
तिसऱया मानांकित 23 वर्षीय सित्सिपसने फ्रान्सच्या ऍड्रियन मॅनारिनोचा 6-3, 6-4, 6-7 (4-7), 6-0 असा पराभव केला. या सामन्यातही त्याने तिसऱया व चौथ्या सेटच्या दरम्यान 8 मिनिटांचा टॉयलेट ब्रेक घेतला. याआधी पहिल्या फेरीत अँडी मरेविरुद्धच्या सामन्यावेळीही त्याने असा मोठा बाथरूम ब्रेक घेतला होता आणि मरेने त्यावर संताप व्यक्त करीत त्याची थट्टाही केली होती. मात्र यावेळी प्रेक्षकांनीही सित्सिपसची टर उडविली. एटीपीच्या नियमानुसार टॉयलेट ब्रेकला वेळेची मर्यादा नसते. त्याचा फायदा सित्सिपस उठवत आहे. त्याने या सामन्यात सर्वाधिक 27 बिनतोड सर्व्हिस केल्या. या वर्षातील त्याचा हा 50 वा विजय होता. बंदिस्त स्टेडियम असले तरी जोरदार वाऱयामुळे पावसाचे पाणी काही भागातून आत येत असल्याने केविन अँडरसन व दिएगो श्वार्ट्झमन यांच्यातील दुसऱया फेरीचा सामना थांबविण्यात आला व नंतर तो पूर्ण करण्यात आला.
रुडचा धक्कादायक पराभव
रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हने तिसरी फेरी गाठताना डॉमिनिक कोएफरचा 6-4, 6-1, 6-2 असा पराभव केला. त्याची लढत स्पेनच्या पाब्लो अँडय़ुअरशी होणार आहे. त्याचाच देशवासी पाचव्या मानांकित आंद्रेय रुबलेव्हने स्पेनच्या पेड्रो मार्टिनेझचा 7-6 (7-2), 6-7 (5-7), 6-1, 6-1 असा पराभव केला. त्याची पुढील लढत अमेरिकेच्या फ्रान्सेस टायफोशी होईल. पात्रता फेरीतून आलेल्या हॉलंडच्या बोटिक व्हान डी झान्डशुल्पने सर्वात धक्कादायक निकाल नोंदवताना नॉर्वेच्या आठव्या मानांकित कॅस्पर रुडला 3-6, 6-4, 6-3, 6-4 असे नमवित स्पर्धेबाहेर घालविले. रुडप्रमाणे डिमिट्रोव्हचे आव्हानही दुसऱया फेरीत समाप्त झाले. त्याला ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्सी पॉपीरिनने 7-6 (7-4), 7-6 (7-4), 4-0 असे नमविले. ड्रिमिट्रोव्हने दुखापतीमुळे तिसऱया सेटवेळी माघार घेतली.
ओसाकाला पुढे चाल
महिलांमध्ये विद्यमान विजेत्या नाओमी ओसाकाला मैदानावर न उतरताच तिसऱया फेरीत स्थान मिळाले. तिची 20 वर्षीय सर्बियन प्रतिस्पर्धी ओल्गा डॅनिलोविचने तब्बेत बरी नसल्याने या लढतीतून माघार घेतल्याने ओसाकाला पुढे चाल मिळाली. तिची पुढील लढत कॅनडाच्या लेलाह फर्नांडेझविरुद्ध होणार आहे. माजी विजेत्या अमेरिकेच्या स्टीफेन्सने आपल्याच देशाच्या 21 व्या मानांकित कोको गॉफला 6-4, 6-2 असे नमवित स्पर्धेबाहेर घालविले. दोनदोन वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेल्या अझारेन्का व मुगुरुझा यांनीही तिसऱया फेरीत स्थान मिळविले. अझारेन्काने इटलीच्या जस्मिन पावोलिनीवर 6-3, 7-6 (7-1) अशी मात केली तर मुगुरुझाने जर्मनीच्या आंदेया पेटकोविकला 6-4, 6-2 असे नमविले. रोमानियाच्या 12 व्या मानांकित सिमोना हॅलेपने स्लोव्हाकियाच्या क्रिस्टिना कुकोव्हाचा 6-3, 6-1 असा धुव्वा उडवित आगेकूच केली.