वृत्तसंस्था/ पॅरिस
जागतिक क्रमवारीत 85 व्या स्थानावर असणाऱया तमारा झिदान्सेकने पेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. एखाद्या ग्रँडस्लॅममध्ये उपांत्य फेरी गाठणारी स्लोव्हेनियाची ती पहिली महिला टेनिसपटू बनली आहे. याशिवाय विद्यमान विजेती इगा स्वायटेक, मारिया साकेरी, राफेल नदाल, नोव्हॅक जोकोविच, दिएगो श्वार्ट्झमन यांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. गतउपविजेत्या व चौथ्या मानांकित सोफिया केनिनचे आव्हान मात्र संपुष्टात आले.
झिदान्सेकने स्पेनच्या पॉला बॅडोसाचा 7-5, 4-6, 8-6 असा पराभव करून पहिल्यांदाच या स्पर्धेत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. तिची उपांत्य लढत 21 वी मानांकित कझाकची इलेना रीबाकिना किंवा 31 वी मानांकित रशियाची ऍनास्तेशिया पॅव्हल्युचेन्कोव्हा यापैकी एकीशी होईल.
स्वायटेकची आगेकूच
विद्यमान विजेत्या पोलंडच्या आठव्या मानांकित इगा स्वायटेकने जेतेपद स्वतःकडेच राखण्याच्या दिशेने आगेकूच करताना युक्रेनच्या मार्टा कोस्टयुकचा 6-3, 6-4 असा पराभव करून शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. ग्रीकच्या 17 व्या मानांकित मारिया साकेरीशी तिची पुढील लढत होणार आहे. नाईट कर्फ्यू असल्यामुळे स्वायटेक-मार्टा नाईट सामन्याला प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली नव्हती. ‘या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे मला जुळवून घेणे फारच अवघड जात आहे. प्रकाशझोत खूपच ब्राईट असल्याने मला ऍडजस्ट करून घ्यावे लागत होते. काही वेळा तर स्मॅश फटका मारताना डोळय़ावरच उजेड येत होता, त्यावेळी फारच त्रास सहान करावा लागला,’ असे स्वायटेक सामन्यानंतर म्हणाली. पहिल्या तीन फेऱयात मार्टाने एकही सेट गमविला नव्हता. येथेही तिने पहिल्या सेटमध्ये स्वायटेकवर मोठे दडपण आणत तिला बॅकफूटवर लोटले होते. पण स्वायटेकने नंतर नियंत्रण मिळविले आणि मार्टाच्या चुकांचा फायदा घेत तिने सामनाही संपविला.
केनिनला धक्का
गतउपविजेत्या अमेरिकेच्या चौथ्या मानांकित सोफिया केनिनला मात्र यावेळी उपउपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा धक्का बसला. ग्रीसच्या मारिया साकेरीने तिचा 6-1, 6-3 असा फडशा पाडत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. जागतिक क्रमवारीत 18 व्या स्थानावर असणाऱया साकेरीने 68 मिनिटांत हा सामना संपविला. साकेरीने आधीच्या फेरीत 14 व्या मानांकित एलिस मर्टेन्सला पराभवाचा धक्का दिला होता.
श्वार्ट्झमन, नदाल विजयी
पुरुष एकेरीत अर्जेन्टिनाच्या दहाव्या मानांकित दिएगो श्वार्ट्झमनने तिसऱयांदा या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना जर्मनीच्या जॅन लेनार्ड स्ट्रफचे कडवे आव्हान 7-6 (11-9), 6-4, 7-5 असे संपुष्टात आणले. श्वार्ट्झमनसमोर आता 13 वेळा ही स्पर्धा जिंकणाऱया राफेल नदालचे आव्हान असेल. गेल्या वर्षी उपांत्य फेरीत श्वार्ट्झमनला नदालकडून पराभव स्वीकारावा लागला होता. स्ट्रफने याआधी फक्त एकदाच ग्रँडस्लॅमची चौथी फेरी गाठली होती. नदालने 15 व्या वेळी या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना इटलीचा 19 वर्षीय युवा खेळाडू यानिक सिनरचा 7-5, 6-3, 6-0 असा पराभव केला. येथील स्पर्धेत नदालने मिळविलेला हा 104 वा विजय आहे.
जोकोविच बचावला
जागतिक अग्रमानांकित सर्बियाच्या जोकोविच स्पर्धेबाहेर पडण्यापासून थोडक्यात बचावला. इटलीचा आणखी एक 19 वर्षीय युवा खेळाडू लॉरेन्झो मुसेटीने पहिले दोन सेट्स जिंकून जोकोविचला चकित केले होते. पण नंतरच्या दोन सेट्समध्ये त्याला हा जोम टिकवता आला नाही आणि पाचव्या सेटवेळी 0-4 असे पिछाडीवर असताना मुसेटीने सामन्यातून माघार घेतली. जोकोविच त्यावेळी 6-7 (7-9), 6-7 (2), 6-1, 6-0, 4-0 असा पुढे होता. जोकोविचची उपांत्यपूर्व लढत इटलीच्याच मॅटेव बेरेटिनीशी होणार आहे. रॉजर फेडररने माघार घेतल्यामुळे बेरेटिनीला पुढे चाल मिळाली होती. जोकोविचने ही स्पर्धा 2016 मध्ये जिंकली होती.
रोहन बोपण्णाचे पुरुष दुहेरीतील आव्हान समाप्त
भारताच्या रोहन बोपण्णाचे पुरुष दुहेरीतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले. त्याच्या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले. क्रोएशियाच्या प्रँको प्रुगरसमवेत खेळणाऱया बोपण्णाला स्पेनच्या पाब्लो अँडय़ुअर व पेड्रो मार्टिनेझ यांच्याकडून 5-7, 3-6 असा पराभव पत्करावा लागला. सुमारे सव्वातास ही लढत चालली होती. आधीच्या फेरीत बोपण्णा-स्कुगर यांना मॅटवे मिडेलकूप व मार्सेलो ऍरेव्हालो यांच्याकडून पुढे चाल मिळाली होती. गेल्या आठवडय़ात भारताच्या दिविज शरण, अंकिता रैना यांना पुरुष व महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतच पराभव स्वीकारावा लागला होता. एकेरीत सुमित नागल, रामकुमार रामनाथन व प्रज्नेश गुणेश्वरन, अंकिता रैना यांना मुख्य स्पर्धेसाठी पात्रता मिळविण्यातही अपयश आले होते.