नंदगड मराठी शाळेशेजारी स्वच्छतागृह बांधण्याचा अट्टाहास का, ग्रामस्थांचा सवाल
प्रतिनिधी / खानापूर
नंदगड जॉईंट सेंट्रल स्कूल आवारातील कानडी माध्यमाच्या शाळेसाठी दोन खोल्या मंजूर झाल्या आहेत. त्या खोल्या बांधण्यासाठी उर्दू माध्यमाच्या शाळेचे स्वच्छतागृह पाडवण्यात आले आहे. आणि ते स्वच्छतागृह आता मराठी शाळेच्या स्वयंपाक खोलीच्या बाजूला बांधण्याचा घाट घातला आहे. पण त्याला मराठी शाळेच्या एसडीएमसी कमिटीने तसेच नंदगडमधील मराठी भाषिकांनी तीव्र विरोध केला आहे. असे असताना एखाद्यावेळी स्वच्छतागृह बांधलेच तर ते जमिनदोस्त करू, असा इशाराही मराठी भाषिकांनी दिला आहे. यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी मराठी शाळेच्या एसडीएमसी कमिटीची व नागरिकांची बैठक बोलाविण्यात येणार आहे.
नंदगड येथील जॉईंट सेंट्रल स्कूलच्या आवारात मराठी, कानडी व उर्दू शाळांसाठी स्वतंत्र इमारती आहेत. तसेच तिन्ही शाळांना स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात आली आहेत. त्यातच आता कन्नड शाळेसाठी दोन खोल्या मंजूर झाल्या आहेत. त्या खोल्या बांधण्यासाठी कन्नड शाळेला लागूनच जागाही आहे. एकावर एक अशा दोन खोल्या त्या ठिकाणी व्यवस्थित बसू शकतात. पण असे असताना त्या खोल्या बांधण्यासाठी आता उर्दू शाळेचे स्वच्छतागृह ग्राम पंचायत एका माजी अध्यक्षाच्या सांगण्यावरून पाडवण्यात आले आहे. आणि त्या ठिकाणी कन्नड शाळेच्या खोल्या बांधल्या जाणार आहेत.
आता उर्दु शाळेसाठी मराठी शाळेच्या स्वयंपाक घराशेजारी स्वच्छतागृह बांधण्याचा घाट घालण्यात आला आहे. पण यासाठी मराठी शाळेच्या एसडीएमसी कमिटीला विश्वासात न घेताच निर्णय घेण्यात आला आहे. त्या ठिकाणी स्वच्छतागृह बांधल्यास मराठी शाळेवर मोठा अन्याय होणार असून याला मराठी शाळेच्या एसडीएमसी कमिटीने तसेच मराठी भाषिकांनी तीव्र विरोध केला आहे. या विरोधाला डावलून स्वच्छतागृह बांधले तर जमिनदोस्त करू, असा इशाराही देण्यात आला आहे. वास्तविक जॉईंट सेंट्रल स्कूलच्या आवारात जागेची व बांधकामाची सदलाबदल करायची झाल्यास तिन्ही शाळांच्या एसडीएमसी कमिटीची बैठक घेऊन निर्णय घ्यावयास हवा होता. पण या बाबतीत मनमानी केल्याने या निर्णयाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली आहे.