दीडशे कर्मचाऱ्यांच्या निवडीचा तिढा कायम : अर्जांची व्यवस्थित छाननी करून घेण्याची सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या 155 जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करून अर्ज घेण्यात आले आहेत. अर्जांची आतापर्यंत चार ते पाचवेळा छाननी झाली आहे. सदर अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले होते. मात्र, 13 जणांच्या अर्जांवर जन्मतारखांची नोंद नसल्याने सर्वच अर्ज महापालिकेकडे पाठवून व्यवस्थित छाननी करून घेण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे स्वच्छता कामगारांच्या निवडीचा तिढा कायम आहे. स्वच्छता कामगारांच्या जागा तातडीने भरून घ्या, असा आदेश नगरविकास खात्याने बजावला आहे. दोन वर्षांमागे 155 जागा भरून घेण्यासाठी अधिसूचना जारी करून अर्ज घेण्यात आले होते. स्वच्छता कामगारांच्या निवडीची यादी प्रसिद्ध करण्यापूर्वीच आणखी 100 जागा भरून घेण्यासाठी नगरविकास खात्याने मंजुरी दिली आहे. तसेच तातडीने अर्ज घेऊन निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. पण पूर्वीच्या 155 जागा भरून घेण्याची प्रक्रिया अपूर्ण असून निवडीचा तिढा कायम आहे. तर यापूर्वी अर्ज केलेल्या स्वच्छता कामगारांच्या निवडीची यादी अद्यापही लटकलेली आहे. 900 स्वच्छता कामगारांनी 155 जागांसाठी अर्ज केले आहेत. त्याचप्रमाणे अलीकडेच मागविण्यात आलेल्या 100 जागांसाठी 841 स्वच्छता कामगारांनी अर्ज केले आहेत. तर 900 अर्जांची छाननी यापूर्वी चार ते पाचवेळा करण्यात आली आहे. अपात्र अर्ज बाजूला काढून पीएफ, ईएसआय, वयाचा दाखला आदी सर्व कागदपत्रांची छाननी करून स्वच्छता कामगारांच्या निवडीसाठी यादी तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज पाठविण्यात आले होते. यापैकी 155 स्वच्छता कामगारांची निवड केली जाणार आहे. पण सदर अर्जांमध्ये 13 अर्जांवर जन्मतारखेची नोंद झाली नाही. त्याचप्रमाणे ज्येष्ठतेनुसार यादी तयार करण्यात आली नसल्याचे नमूद करून जिल्हाधिकारी कार्यालयातून हे अर्ज महापालिकेकडे माघारी धाडण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेला अर्जांची छाननी व्यवस्थित करावी लागणार आहे. प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या त्रुटी काढल्या जात असून 155 स्वच्छता कामगारांच्या निवडीचा तिढा अद्याप सोडविण्यात आलेला नाही. या स्वच्छता कामगारांची निवड कधी होणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. प्रथम 155 स्वच्छता कामगारांच्या निवडीची यादी जाहीर केल्यानंतरच 100 जागांच्या भरतीसाठी प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.