हॅटट्रीक चुकली, विटा देशात पहिले; पाचगणीसह पहिल्या दहामध्ये समावेश
प्रतिनिधी/ कराड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी उपक्रम असणाऱया स्वच्छ सर्वेक्षणमध्ये 2019 व 2020 अशी दोन वर्षे देशात प्रथम क्रमांक मिळवणाऱया कराड नगरपालिकेची 2021 मध्ये घसरण झाली आहे. विटा शहराने देशात पहिला क्रमांक मिळवला असून सातारा जिल्हय़ातील कराडने पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे. गौरवप्राप्त पालिकांच्या यादीत पाचगणीचाही समावेश आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात सलग दोन वर्षे एक लाख लोकसंख्येच्या आतील नगरपालिकामध्ये कराड पालिकेने प्रथम क्रमांक मिळवला होता. 2021 मध्ये पहिल्या क्रमांकाची हॅटट्रीक करण्यासाठी कराड पालिकेने कंबर कसली होती. मात्र पालिकेची यंदाची हॅट्रीक हुकली आहे. दिल्ली येथे 20 नोव्हेंबरला स्वच्छ सर्वेक्षणचा 2021 चा निकाल जाहीर होणार आहे. त्यानिमित्त दिल्लीत स्वच्छ अमृत महोत्सव होत आहे. त्या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारच्या शहरी व गृहनिर्माण मंत्रालयाने राज्यातील विजेत्या पालिका, महापालिकांना निमंत्रण दिले आहे. त्यात कराड पालिकेचा समावेश आहे. त्या यादीत कराड चौथ्या क्रमांकावर आहे. सांगली जिह्यातील विटा, पुणे जिह्यातील लोणावळा, सासवड आदी पालिकांची नावे प्रथम तीन क्रमांकावर आहेत. या तीन पालिकांचा सन्मान महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते होणार असल्याचे म्हटले आहे. या यादीत तर कराडचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. कराडची यंदाची हॅट्रीक हुकली तरी पहिल्या पाचमध्ये मात्र समावेश आहे. पहिल्या दहामध्ये पाचगणी नगरपालिकेचाही समावेश आहे.
केंद्रीय शहरी कार्य मंत्रालयाच्या सचिव व स्वच्छ सर्वेक्षणाच्या संचालक रूपा मिश्रा यांनी लेखी पत्रे पालिकांना पाठवली आहेत. त्या पत्रांत विजत्या पालिकांचा सन्मान करण्यात येणार असल्याचा थेट उल्लेख आहे. स्वच्छ सर्वेक्षणमधील कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाचाही सन्मान करण्यात येणार आहे. त्यासह राज्यातील एकूण 21 शहरांचा गौरव होणार आहे.