मोहिमेवेळी पूर्ण काळजी घेण्याची केंद्राकडून राज्यांना सूचना
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सोमवारपासून सुरू होणाऱया 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणावेळी अत्यंत काळजी घेण्याचा सल्ला केंद्र सरकारने राज्यांना दिला आहे. लसीकरणादरम्यान मुलांची लस प्रौढांच्या लसीमध्ये मिसळणार नाही यासाठी योग्य काळजी घेण्याचे निर्देश आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिले आहेत. प्रौढांच्या आणि मुलांच्या लसीकरणासाठी वेगवेगळे कक्ष स्थापण्याची सूचना आरोग्य मंत्रालयाने केली आहे. केंद्र सरकारने यासंबंधी सर्व राज्ये-केद्रशासित प्रदेशांशी पत्रव्यवहार केला आहे.
मागील आठवडय़ात पंतप्रधान मोदींनी मुलांच्या लसीकरणाची तारीख जाहीर केल्यापासून या मोहिमेला चालना देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना दिशानिर्देश जारी करण्यात आले. त्यानंतर राज्यांनी आपापल्या पातळीवर पूर्वतयारी केली आहे. त्यानुसार काही ठिकाणी जिल्हा-तालुका लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार असून बहुतांश ठिकाणी थेट शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन लसीकरण केले जाणार आहे. या लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रियेला मुलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. को-विन ऍपवरून नोंदणी सुरू झाली असून पहिल्या दोन दिवसातच लाखो विद्यार्थ्यांनी रजिस्टेशन करत आपला स्लॉट निश्चित केला आहे.