इसीजी टेक्निशियन प्रतीक्षा सातार्डेकर सांभाळताहेत महत्वपूर्ण जबाबदारी
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
स्वत:ला हृदयविकाराचा त्रास असताना देखील आजारपण बाजूला ठेवत सिंधुदुर्गातील कोरोनाग्रस्तांसाठी थेट सेवा देणाऱया जिल्हा रुग्णालयातील इसीजी टेक्निशियन सौ. प्रतीक्षा सातार्डेकर यांची ‘कोरोना वॉरियर’ म्हणून नवी ओळख पुढे आली आहे.
सौ. सातार्डेकर गेली अनेक वर्षे जिल्हा रुग्णालयात इसीजी विभागाची यशस्वीपणे जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांचे पती प्रशांत सातार्डेकर हे जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये टेक्निशियन म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. ज्यावेळी सिंधुदुर्गात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला, त्यावेळी प्रतीक्षा यांच्यावर कोरोना रुग्णांचे इसीजी काढण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. खरं तर ती जबाबदारी जास्त धोक्याची असते. कारण यामध्ये थेट रुग्णांशी संपर्क येत असतो. आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्हय़ात जेवढे काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झाले, त्या सर्व रुग्णांचे इसीजी सौ. प्रतीक्षा यांनी काढले. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता यापुढे प्रतीक्षा यांची जबाबदारी आणि जोखिम अधिक वाढणार आहे.
मळेवाड येथे मूळ घर असलेल्या प्रतीक्षा या आता सिंधुदुर्गनगरीमध्ये स्थायिक झाल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात काम करीत असताना ज्यावेळी त्यांच्यावर कोरोना पॉझिटिव्ह व कोरोना संशयित रुग्णांचे इसीजी काढण्याची जबाबदारी सोपविण्यात आली, त्यावेळी सुरुवातीला त्यांच्यावर प्रचंड दडपण आले. आपल्यामुळे कुटुंबियांना काही धोका पोहोचू नये, याचेही टेन्शन त्यांना होते. प्रतीक्षा यांचा मुलगा प्रज्योत याला धोका पोहोचू नये, यासाठी त्याला त्याच्या मळेवाड येथील घरी पाठविण्यात आले. आता पतीसमवेत त्या घरी राहत असतात. दोघेही जिल्हा रुग्णालयात महत्वाची जबाबदारी सांभाळत असल्यामुळे त्यांना ही जबाबदारी टाळता येणार नव्हती. सुरुवातीला काही दिवस प्रतीक्षा यांनाही रुग्णालयात क्वारंटाईन होऊन राहावे लागले. त्यांना स्वत:ची स्वॅब टेस्ट करून घ्यावी लागली. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर टेन्शन, भीती सर्व काही बाजूला ठेवून त्या नियमितपणे कोरोनाग्रस्तांच्या सेवेत रुजू झाल्या. जिल्हय़ात आतापर्यंत जे कोरोना रुग्ण मिळाले, त्या सर्व रुग्णांचे इसीजी प्रतीक्षा यांनी काढलेले आहेत. ही जबाबदारी सांभाळत असताना स्वत:च्या जीविताची काळजी घेत कोरोनाग्रस्तांना उत्तम सेवा देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढीची सुद्धा महत्वपूर्ण जबाबदारी असून या रक्तपेढीमध्ये प्रतीक्षा यांचे पती प्रशांत सातार्डेकर हे देखील महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत. कोरोनाच्या या लढाईत स्वत:चा जीव धोक्यात घालून समाजासाठी योगदान देणाऱया प्रतीक्षा व त्यांचे पती प्रशांत सातार्डेकर यांना तमाम सिंधुदुर्गवासीयांचा सलाम.