हेलिपॅडवर उतरताच जन्मभूमीवर नतमस्तक
वृत्तसंस्था/ कानपूर
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सध्या उत्तरप्रदेशातील कानपूर ग्रामीणमधील स्वतःचे मूळ गाव परौंख येथे आहेत. रविवारी तेथे पोहोचल्यावर राष्ट्रपती कोविंद भावुक झाल्याचे दिसून आले. तेथे हेलिपॅडवर उतरून त्यांनी स्वतःच्या जन्मभूमीवर नतमस्क होत मातीला स्पर्श केला आहे.
गावातील माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीला देशाच्या सर्वोच्च पदाची जबाबदारी पार पाडण्याची संधी प्राप्त होईल अशी कल्पना मी स्वप्नातही केली नव्हती. पण आमच्या लोकशाहीवादी व्यवस्थेने हे करून दाखविले असल्याचे उद्गार राष्ट्रपतींनी यावेळी काढले आहेत.
माझे गाव नेहमी माझ्यासोबत
गावातील अभिनंदन समारंभाला संबोधित करताना कोविंद यांनी स्वतःचे मन मोकळे केले आहे. मी कुठेही असलो तरीही माझ्या गावाच्या मातीचा सुगंध आणि माझ्या गावातील लोकांच्या आठवणी माझ्या मनात सदैव असतात. माझ्यासाठी परौंख केवळ एक गाव नसून ही माझी मातृभूमी आहे. येथूनच मला पुढे जात देशसेवेची सदैव प्रेरणा मिळत राहिल्याचे उद्गार राष्ट्रपतींनी काढले आहेत.
भारतीय संस्कृतीचा उल्लेख
भारतीय संस्कृतीत ‘मातृ देवो भव’, ‘पितृ देवो भव’, ‘आचार्य देवो भव’चे शिक्षण दिले जाते. आमच्या घरातही हीच शिकवण देण्यात येत होती. आईवडिल आणि गुरु तसेच ज्येष्ठांचा आदर करणे आमच्या ग्रामीण संस्कृतीत अधिक स्पष्टपणे दिसून येते असे राष्ट्रपती म्हणाले.
घटनाकारांना नमन
देशाचे स्वातंत्र्यसेनानी आणि घटनाकारांचे अमूल्य बलिदान आणि योगदानासाठी आज यानिमित्त नमन करतो. आज मी ज्या पदापर्यंत पोहोचलो आहे, त्याचे श्रेय या गावातील माती आणि हे क्षेत्र तसेच सर्व लोकांचे प्रेम आणि आशीर्वादाला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.