अमित शाह यांना गुजरातीपेक्षा हिंदी अधिक पसंत- राजभाषा संमेलनाला उपस्थित
वृत्तसंस्था/ वाराणसी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वाराणसीतील अखिल भारतीय राजभाषा संमेलनात हिंदी भाषेला मजबूत करण्यावर भर दिला आहे. स्वतःच्या मुलांशी मातृभाषेत बोला, याप्रकरणी लाज बाळगण्याचे कुठलेच कारण नसल्याचा सल्ला शाह यांनी दिला आहे. आमची मातृभाषा आमचा गौरव आहे. मला गुजरातीपेक्षा हिंदी भाषा अधिक पसंत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राजभाषा संमेलन दिल्लीबाहेर आयोजित करण्याचा निर्णय आम्ही 2019 मध्येच घेतला होता. कोरोना काळामुळे हा निर्णय लागू करता आला नव्हता. पण ही नवी सुरुवात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात होत असल्याने मला आनंद होतोय असे उद्गार त्यांनी काढले आहेत.
स्थानिक भाषांदरम्यान अंतर्विरोध नाही
स्वभाषेला स्वतःच्या जीवनाचा हिस्सा करा. हिंदी आणि आमच्या सर्व स्थानिक भाषांदरम्यान कुठलाच अंतर्विरोध नाही. हिंदीला अधिक लवचिक करावे लागणार आहे. हिंदीचा शब्दकोष मजबूत केला जावा. पूर्वी हिंदी भाषेसाठी अनेक वाद उभे करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण आता तो काळ समाप्त झाला आहे. पंतप्रधान मोदींनी गौरवासोबत आमच्या भाषांना जगभरात स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
स्वभाषा आवश्यक
जोपर्यंत देशाच्या प्रशासनाची भाषा स्वभाषा होणार नाही, तोवर लोकशाही यशस्वी ठरू शकत नाही. जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱया लिपिबद्ध भाषा भारतात आहेत. या भाषांचा वापर आम्हाला वाढवावा लागेल. भाषा जितकी सशक्त आणि समृद्ध होईल तितकीच संस्कृती विस्तृत अन् सशक्त होणार आहे. स्वतःच्या भाषेबद्दलची आत्मियता आणि तिच्या वापरात कधीच कमीपणा वाटून घेऊ नका. भाषा हा गौरवाचा विषय असल्याचे शाह यांनी म्हटले.
नव्या शिक्षण धोरणात भर
देशात लागू करण्यात आलेल्या नव्या शिक्षण धोरणाचा एक प्रमुख पैलू भाषांचे संरक्षण आणि संवर्धन आहे. राजभाषाच्या संरक्षण आणि संवर्धनावरही जोर देण्यात आला असल्याचे ते म्हणाले.