स्पर्धा परीक्षा वेबिनारमध्ये जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे आवाहन
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
प्रत्येकाचे अभ्यासाचे वेगळे तंत्र असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देताना आत्मपरीक्षण करून अभ्यासाचे तंत्र विकसित करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले. ‘प्रेरणा’ उपक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांसाठी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून पहिल्या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी के. मंजुलक्ष्मी बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, सहाय्यक जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा यांनीही विद्यार्थ्यांना यु. पी. एस. सी. च्या परीक्षांबाबत मार्गदर्शन केले.
विषय निवड, अभ्यासक्रम…
पूर्वपरीक्षेसाठी आपल्या आवडीच्या विषयाची निवड करावी, असे सांगून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, या परीक्षांना सामोरे जाताना विषयाची निवड, अभ्यासक्रम, पुस्तकांची निवड याबरोबरच मुलाखतीची तयारीही महत्वाची असते. अनेक पुस्तकांचा अभ्यास करण्यापेक्षा एकाच पुस्तकाचा वारंवार अभ्यास करणे जास्त फायद्याचे ठरते. कोचिंग क्लासेसचा फायदा होतो. त्यामुळे अभ्यासाची वातावरण निर्मिती होत असते. अभ्यास करत असताना त्याचे वेळापत्रक तयार करणेही तितकेच महत्वाचे आहे. पेपर सोडवत असतानाही वेळेचे नियोजन केले पाहिजे. त्यासाठी पूर्वतयारी आवश्यक आहे. पेपर सोडविण्याचा सराव करावा. लिखाणही तितकेच महत्वाचे आहे. मॉक टेस्ट नियमितपणे द्याव्यात. तुम्हाला जर संगीत आवडत असेल तर दिवसातील काही वेळ ते ऐका. त्यामुळे अभ्यासात एकाग्रता वाढविण्यास मदतच होणार आहे. फक्त अभ्यास करणे, इतर गोष्टी न करणे असे करू नका, नियमितपणे वर्तमानपत्रे वाचावीत. त्यातून नोट्स काढाव्यात. प्रत्येक क्षेत्रातील महत्वाच्या गोष्टींची तुम्हाला माहिती असली पाहिजे.
विषयाची निवड आवडीने करा -नायर
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीन नायर म्हणाले, मुलाखत हा एक महत्वाचा टप्पा आहे. त्याची तयारी करण्यासाठी मॉक इंटरव्हय़ूव्ह महत्वाचा आहे. विषयांची निवड आवडीने करावी. प्रत्येक विषयावर बाजारात अनेक पुस्तके आहेत. सर्व उपयुक्त आहेत म्हणून सर्व वाचण्याऐवजी समग्र पुस्तक निवडावे. मुलाखतीच्या वेळी कोणताही ताण घेऊ नये.
इंटरनेटचा आधार घ्या!
सहाय्यक जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा म्हणाल्या, आताच्या काळात इंटरनेटवर सर्व माहिती उपलब्ध आहे. पुस्तके, अभ्यासक्रम याची सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी त्याचाही अभ्यास करावा.
यावेळी विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, विषयांची निवड, अभ्यासक्रम, अभ्यासाची पद्धत, तंत्र यासह विविध विषयांची तयारी करण्यासाठी करायचे नियोजन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हय़ात प्रेरणा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अशा प्रकारचे पहिलेच सत्र आयोजित करण्यात आले होते. पुढील सत्रांमध्ये भाषा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग या विषयीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.