अंतिम परीक्षणही यशस्वी : डीआरडीओकडून निर्मिती : 3 किलोग्रॅम वजन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय सैन्याच्या सामर्थ्यात सातत्याने भर पडत आहे. डीआरडीओकडून निर्मित प्रोटेक्टिव कार्बाइनचे परीक्षण यशस्वी ठरल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी दिली आहे. उन्हाळय़ातील अधिक तापमान आणि हिवाळय़ातील परीक्षणाचा हा अंतिम टप्पा होता. प्रोटेक्टिव कार्बाइनने अचूकपणा आणि विश्वासार्हतेच्या सर्व मापदंडांची पूर्तता केली आहे. याचमुळे ही काबाईन सैन्यात सामील होण्यास तयार असल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
जॉइंट वेंचर प्रोटेक्टिव कार्बाइन म्हणजेच जेपीवीसी सेमी ऑटोमॅटिक शस्त्र आहे. 3 किलोग्रॅम वजनाचे हे शस्त्र 100 मीटरच्या कक्षेपर्यंत 700 आरपीएमच्या दराने गोळय़ा झाडू शकते. ही कार्बाइन डीआरडीओच्या पुण्यातील आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने (एआरडीई) भारतीय सैन्याच्या सीएसक्यूआरच्या आधारावर डिझाइन केली आहे. विशेष म्हणजे या शस्त्राने यापूर्वी एमएचए ट्रायल्स यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.
काबाईन लहान व्याप्तीच्या मोहिमेसाठी विशेष कॅलिबर शस्त्र आहे. निरंतर गोळीबारादरम्यान ही कार्बाइन सहजपणे हाताळता येते आणि एका हातानेही गोळीबार करता येणार आहे.