वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात मोठय़ा संख्येत लोक समाजमाध्यमांचा वापर करतात. देशात समाजमाध्यम वापरकर्त्यांची संख्या 50 कोटीपेक्षा अधिक आहे. तरीही समाजमाध्यम बाजारपेठेत विदेशी कंपन्यांचे वर्चस्व आहे. पण भारतीय हिस्सेदारी वाढविण्याच्या उद्देशाने रविवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पहिले स्वदेशी समाजमाध्यम ऍप अलायमेंट्सचे सादरीकरण करणार आहेत. समाजमाध्यमांवर विदा खासगीत्वाचा प्रश्न उपस्थित होतो. याप्रकरणी विदेशी कंपन्या अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. याच कारणामुळे स्वदेशी ऍपमध्ये प्रामुख्याने विदा खासगीत्वावर भर देण्यात आला आहे.
रविवारच्या लाँचिंग कार्यक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर उपस्थित राहणार आहेत. ऍप लाँचिंगप्रसंगी योगगुरु बाबा रामदेव, अयोध्या राम रेड्डी, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची उपस्थिती अपेक्षित आहे. अलायमेंट्स ऍपमध्ये वापरकर्त्याचा विदा सुरक्षित राहणार असून तो विनाअनुमती त्रयस्थ संस्थेला उपलब्ध होणार नाही.
पूर्व लडाखच्या गलवान खोऱयात चीनसोबत हिंसक झटापट झाल्यावर भारताने त्याच्या 59 ऍप्सवर बंदी घातली होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना ऍप निर्मितीचे आव्हान दिले आहे. भारत जगासाठी समाजमाध्यम आणि तंत्रज्ञानासाठी अत्यंत मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेचा लाभ भारतही उचलू शकतो.
प्ले स्टोअरवर उपलब्ध
हा ऍप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून लाखो लोकांनी तो डाउनलोड केला आहे. परंतु याचे अधिकृत सादरीकरण आज होणार आहे. हा ऍप 8 भाषांमध्ये उपलब्ध होणार असून यात ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंगची सुविधाही दिली जाणार आहे. ऍप आणि समाजमाध्यम प्रकरणी आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्न भारताकडून सुरु आहे. समाजमाध्यमाची बाजारपेठ हजारो कोटी रुपयांची असून भारतीय ग्राहकांचेही प्रमाणही प्रचंड आहे.