पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या निकालात कॉलेजमध्ये प्रथम :
प्रतिनिधी / कणकवली:
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊननंतर गावी दारिस्ते येथे आलेल्या व ऑनलाईन शिक्षणासाठी डोंगरावर झोपडीतून अभ्यासाचे धडे गिरविणाऱया स्वप्नाली सुतारने पशुवैद्यकीय पदवीच्या दुसऱया वर्षाच्या परीक्षेत कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे शिक्षण घेणाऱया कु. स्वप्नाली 119 विद्यार्थ्यांमधून कॉलेजमध्ये 8.6 ग्रेड मिळवत प्रथम आली आहे. या यशाबद्दल तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या स्वप्नालीने बारवीच्या परीक्षेत विज्ञान शाखेत 88 टक्के गुण मिळविले होते. त्यानंतर पशुवैद्यकीय पदवीसाठी तिने मुंबई येथे प्रवेश घेतला. मात्र, गतवर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर ती गावी आली. गावी दारिस्ते येथे इंटरनेट मिळत नसल्याने कु. स्वप्नालीने भावाच्या मदतीने घरापासून सुमारे दोन कि. मी. अंतरावर इंटरनेट मिळणाऱया ठिकाणी अभ्यास सुरू केला. पावसापासून रक्षणासाठी भावांनी तेथे झोपडी बांधून दिली. सकाळपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत कु. स्वप्नाली त्या झोपडीतून अभ्यास करत होती. मुळात डॉक्टर होण्याची इच्छा असलेल्या कु. स्वप्नाली हीने घराच्या परिस्थितीमुळे पशुवैद्यकीय अधिकारी होण्याचा निर्णय घेत पशुवैद्यकीय पदवीला प्रवेश घेतला होता.
दरम्यान, कु. स्वप्नालीने शिक्षणाच्या जिद्दीपोटी डोंगरावर इंटरनेट शोधून तेथून अभ्यास करत असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासकीय पातळीवरही जाग येत केंद्र शासनाच्या भारत नेट प्रकल्पांतर्गत तिला घरी इंटरनेटची सोय उपलब्ध करून देण्यात आली. गणेश चतुर्थीच्या दिवशी भारत नेटची टीम दारिस्ते येथे पोहोचली. ऑप्टीकल फायबरच्या माध्यमातून तिला इंटरनेट कनेक्शन देण्यात आले.
दरम्यान, अभ्यासाच्या जिद्दीपोटी कु. स्वप्नाली सुतारने डोंगरावरून अभ्यास करून केलेल्या मेहनतीचे अखेर चिज झाले आहे. कु. स्वप्नाली शिक्षण घेत असलेल्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा द्वितीय वर्ष परीक्षेचा निकालही जाहीर झाला आहे. यात स्वप्नालीने कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. स्वप्नालीने अभ्यासासाठी घेतलेली मेहनत व तिने घेतलेल्या परीश्रमाचे अखेर चिज झाले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.