वृत्तसंस्था/ कोची
केरळ सोने तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश तुरुंगातून बाहेर पडली आहे. केरळ उच्च न्यायालयाने स्वप्ना यांना 25 लाख रुपयांच्या बाँडवर तसेच 2 लाख रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने 7 अन्य आरोपी सारिथ पीएस, मोहम्मद शफी पी, जलाल एएम, राबिन्स हमीद, रमीस केटी, शरफुद्दीन केटी आणि मोहम्मद अली यांनाही जामीन मंजूर केला आहे.
एनआयएने युएपीए अंतर्गत स्वप्ना यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला होता. सुमारे 16 महिने तुरुंगात राहिल्यावर स्वप्नाला शनिवारी तुरुंगातून बाहेर पडता आले आहे. 2 नोव्हेंबर रोजी केरळ उच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला होता.
स्वप्ना सुरेशला एनआयएने मागील वर्षी 11 जुलै रोजी अटक केली होती. तेव्हापासून ती न्यायालयीन कोठडीत होती. केरळमधील हे प्रकरण सोने तस्करीशी संबंधित आहे. 5 जुलै 2019 रोजी केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथे सीमा शुल्क विभागाकडून राजनयिक सामग्रीचा भांडाफोड करण्यात आल्यावर एका खेपमध्ये तस्करीद्वारे आणले गेलेले 14.82 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते. त्यानंतरच हे प्रकरण उघडकीस आले होते. याचा तपास अंमलबजावणी संचालनालय (ईडी), एनआयए आणि सीमा शुल्क विभाग करत आहे.