ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अभियांत्रिकी सेवेची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत न झाल्याने आणि नोकरी न मिळाल्याने आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबीयांची खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (शनिवारी) भेट घेतली.
सुप्रिया सुळे यांनी स्वप्नीलच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत त्याच्या बहिणीच्या शिक्षण आणि नोकरीची हमी घेतली. स्वप्नील लोणकर याची आई यावेळी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, लोणकर कुटुंबांना शासन मदत करणारच आहे. मात्र आम्ही देखील त्यांना जो काही सपोर्ट लागेल तो करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी इतक्या टोकाची भूमिका न घेता चर्चेतून प्रश्न सोडवावे, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची बाजू मांडलीच आहे. आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र सरकारसोबत बोलण्यासाठी मी पुढाकार घेईन आणि यावर नक्कीच मार्ग निघेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
- … तर माझा मुलगा वाचला असता
सुप्रिया सुळेंनी लोणकर कुटुंबीयांची भेट घेतली त्यावेळी स्वप्निलच्या आई भावुक झाल्या. आठ दिवसांपूर्वी निर्णय झाला असता तर माझा मुलगा वाचला असता, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. माझ्या मुलाने अनेकांना प्लाझ्मा दिला. अनेकांचे जीव त्याने नवाचविले मात्र तो वाचू शकला नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.