प्रतिनिधी/ मडगाव
‘मेसर्स कृष्णी ज्वेलर्स’ या मडगावातील आस्थापनाचे मालक स्वनिल वाळके (35 वर्षे) यांच्या खून प्रकरणासंबंधी पणजीच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सोमवारी एकूण सहा आरोपीविरुद्ध मडगावच्या न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे.
मुश्तफा शेख, एव्हेडर रॉड्रिग्स, ओंकार पाटील, राहूल कुमार, सनी कुमार आणि कंदन कुमार हे या खून प्रकरणातील सहा आरोपी आहेत. त्यांच्याविरुद्ध कट कारस्थान रचून खून करणे, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमाखाली आरोप ठेवण्यात आलेले आहेत. राहूल कुमार, सनी कुमार आणि कंदन कुमार या तीन आरोपींनी मयत स्वप्निल यांचा खून करण्यासाठी पिस्तुलाची व्यवस्था केली होती असा आरोप आहे.
मडगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक म्हणून काम केलेले आणि सध्या पणजी येथील गुन्हा अन्वेषण विभागात काम करणारे पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने या खून प्रकरणाचा तपास केला होता.
भरदुपारच्या खुनामुळे हादरला होता गोवा
2 सप्टेंबर 2020 रोजी भरदुपारी हल्लेखोरांनी गोळी झाडून आणि सुऱयाने भोसकून वाळके यांचा खून केला होता. दुकानातील दागिन्यांची चोरी करण्याच्या हेतूनेच हा खून करण्यात आला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा दुकानात एक गावठी पिस्तूल सापडले होते. शिवाय दुकानात एक रिकामी काडतूसही सापडली होती. तीन गोळय़ा असलेले मॅगझीन सापडले, अशी त्यावेळी मडगाव पोलिसांनी माहिती दिली होती.
या दुकानात तसेच दुकानाबाहेर सीसीटीव्ही बसविण्यात आलेले होते. आरोपींची ओळख पटविण्यासाठी हे दोन्ही कॅमेरे आणि त्यास संलग्न असलेली यंत्रणा पोलिसानी ताब्यात होती.
व्हिडिओमुळे …
ज्या इमारतीच्याखाली खून झाला त्या इमारतीच्या समोर असलेल्या दुसऱया एका इमारतीत राहणाऱया एका शेजाऱयाने या दुकानाबाहेर घडलेल्या घटनेचे व्हिडिओ चित्रिकरण केले होते. हा व्हिडिओ सोशल मिडियावर झळकत होता. या व्हिडिओतील चित्रफितीनुसार ‘कृष्णी ज्ल्वेलर्स’चे मालक स्वप्निल वाळके दुकानाच्या बाहेर आलेले आहेत, ते कोणाला तरी अडवत आहेत आणि दोन ते तीन हल्लेखोर घटनास्थळाहून पळून जात असल्याचे चित्र दिसत होते.
स्वप्निल हे भाजपच्या कृष्णी वाळकेंचे पुत्र
मयत स्वप्नील वाळके हे भारतीय जनता पक्षाच्या मडगावातील क्रियाशील कार्यकर्त्या कृष्णी वाळके यांचे ते पुत्र होते. गोवा गोल्ड डिलर्स असोसिएशनने मडगावातील ज्वेलर स्वप्निल वाळके यांच्या खूनप्रकरणाचा तीव्र निषेध करुन पोलिसांनी लवकरात लवकर लुटेऱयांना गजाआड करावे, अशी मागणी केली होती.