ऑनलाईन टीम / जयपूर
लैंगिक शोषणप्रकरणी कारावास भोगत असलेला स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूला कोरोनाची लागण झाली असुन त्याची प्रकृती गंभीर असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्याला महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु केले आहेत. दि. 5 मे 2021 रोजी आसारामचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्याची प्रकृती खालावू लागली होती.
फेब्रुवारी महिन्यात आसारामला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने राजस्थान येथील जोधपूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र दोन दिवसांनंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता. आसाराम बापू सध्या जोधपूर मध्यवर्ती कारागृहात तुरुंगवास भोगत असुन . अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. २०१४ साली त्याला इंदौरमधून अटक करण्यात आली.