मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : मंत्री मायकल लोबोंवर कारवाई करण्याची दयानंद मांद्रेकरांकडून मागणी
प्रतिनिधी /म्हापसा
राज्यात साडेपाच हजार नोकऱया सरकारने जाहिरात देऊन बाहेर काढल्या आहेत. अन्य बाकी राहिलेल्या पाच हजार नोकऱयाही बाहेर पडणार, जेणेकरून राज्यात 10 हजार नोकऱया देण्याचे काम या सरकारकडून होईल. गोवा राज्य स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर करण्यासाठी जनतेने भाजपला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिवोली केले.
शिवोली मतदारसंघाच्या दौऱयाच्या प्रारंभी काणका येथील सिद्धपुरुष नारायण देवाच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिवोली मतदारसंघात यावेळी भाजपचे कमळ फुलणार यात शंकाच नाही. 2022 मध्ये राज्यात भाजपचेच सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार दयानंद मांद्रेकर, शिवोली मतदारसंघ मंडळ अध्यक्ष मोहन दाभाळे, राजसिंग राणे, दिगंबर आगारवाडेकर, माजी मंडळ अध्यक्ष नारायण मांद्रेकर, जिल्हा पंचायत सदस्य सनिशा शिरोडकर, निहारिका मांद्रेकर, अमिन शेख, परेश पालयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मे 2021मध्ये आपण मुख्यमंत्रीपदाची धुरा हातात घेतल्यावर विविध योजना हाती घेतल्या. शिवोलीत कार्यकर्त्यांच्या विश्वासावर दोन्ही जिल्हा पंचायत सदस्य निवडून आणले. या मतदारसंघात भाजपचे आमदार नसले तरी माजी आमदार दयानंद मांद्रेकरांच्या नेतृत्वावर शिवोलीवासियांचा विश्वास आहे. साडेचार वर्षे कठीण प्रसंगातून जात असताना तारेवरची कसरत करावी लागली. भाजपचा विकास शिवोलीत झाला आहे. 90 टक्के पैसे येणे बंद झाले असले तरी राज्यात भाजप सरकारने सर्व योजना चालू ठेवल्या. गृहआधार बंद ठेवले नाही. हे सरकार अंत्योदय तत्वावर चालत आहे. स्वयंपूर्ण गोंय ही योजना राबविली. किसान कार्ड आदी विविध योजना आखल्या. 100 टक्के लोकांपर्यंत 100 टक्के योजना पोचल्या की नाही हे लक्षात घेण्यासाठी स्वयंपूर्ण मित्र ही योजना आखली. 100 टक्के लोकांचा विमा उतरविला. कोविड काळात ज्यांचा मृत्यू झाला त्यांना 2 लाख रुपये देण्यात आले, अशा विविध योजना आणल्या.
बेकारी भत्ता अर्ज ऑनलाईन
सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या बेकारी भत्ता योजनेचा फायदा अधिकाधिक लाभार्थींपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. त्यासाठी या योजनेचे अर्ज आजपासून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेंतर्गत मुख्यमंत्र्यांच्याच संकल्पनेतून साकारलेल्या ‘स्वयंपूर्ण गोवा’ या योजनेची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.
आर्थिक स्थिती बिकट, मात्र सरकारला जाण : दयानंद मांद्रेकर
यावेळी माजी आमदार दयानंद मांद्रेकर म्हणाले की, आज आर्थिक स्थिती बिकट असली तरी सरकारला त्याची जाणीव आहे. त्यात कोविड महामारी आली. अशा परिस्थितीत डॉ. प्रमोद सावंत यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. 32 हजार जणांना एकाचवेळी कोरोनाची लागण झाली. अशा परिस्थितीत ऑक्सिजन प्रकल्प दोन ठिकाणी राज्यात उभारले. राज्याची जनता मोठी आहे. आम्हाला पैशांची गरज नाही. विरोधक काहीही म्हणो, भाजपनेच आजवर राज्याला विविध योजना दिल्या. विविध प्रकल्प, पूल आदी सरकारने दिले. त्यावेळी सरकारकडे पैसे होते. त्यामुळे विकाम कामे हाती घेताना आर्थिक समस्या नव्हत्या. आम्हाला कुणाचाही विरोध नव्हता, अशी माहिती माजी मंत्री मांद्रेकर यांनी दिली.
सरकारचे पाऊल योग्य दिशेने : मोहन दाभाळे
मंडळ अध्यक्ष मोहन दाभाळे यांनी सर्वांचे स्वागत केले. सर्व जनतेच्या आणि तमाम शिवोली वासियांच्या सहकार्यामुळे येत्या 2022 च्या निवडणुकीत पुन्हा भाजप सत्तेवर येणार यात काडीमात्र शंका नाही. भाजपने जनतेला विविध योजना दिल्या आहेत व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली जनता योग्य दिशेने पुढे पाऊल टाकत आहे, असा दावाही त्यांनी केला. सूत्रसंचालन पंढरीनाथ पोळे तर आभार परेश पालयेकर यांनी मानले.
मंत्री लोबोंचा हस्तक्षेप चिंताजनक : दयानंद मांद्रेकर
कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांचा शिवोली मतदारसंघात वाढत चाललेला हस्तक्षेप चिंताजनक आहे. ही जखम वेळीच ठीक केली नाही तर ती आणखी जास्त होईल व घाव मोठा होणार. शिवोली मतदारसंघात मंत्री मायकल लोबो आपली पत्नी डिलायला लोबो यांना पुढे करून त्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे सर्वत्र सांगत आहे व त्यांनी बैठकाही घेणे सुरुवात केली आहे. याबाबत संतप्त झालेल्या माजी आमदार दयानंद मांद्रेकर यांनी मुख्यमंत्र्याकडे तक्रार करून लोबो यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
योग्य वेळी योग्य कारवाई- मुख्यमंत्री
समारोप कार्यक्रमात पत्रकारांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्री लोबो शिवोलीत हस्तक्षेप करतात, असा आरोप माजी आमदार दयानंद मांद्रेकर यांनी केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल काय? असा प्रश्न केला असता मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, पक्ष हे पाहत असून योग्यवेळी योग्य ती कारवाई केली जाईल. असे ठोस आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्री आपल्यास उपमुख्यमंत्री करू शकतात
शिवोलीत आपण हस्तक्षेप करीत असल्याने दयानंद मांद्रेकरांच्या तक्रारीवरून मुख्यमंत्र्यानी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली असता पत्रकारांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना छेडले असता मुख्यमंत्र्यांनी यावर योग्यवेळी योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले. यावर मंत्री मायकल लोबो आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मुख्यमंत्री आपल्यास उपमुख्यमंत्री करू शकतात. त्यापलिकडे ते काहीच करू शकत नाही. त्यालाही कारवाई म्हणतात. एक तर ते आपल्यास मंत्री मंडळातून काढू शकतात वा उपमुख्यमंत्री करू शकतात.
मंत्री मायकल लोबो
आपला अडथळा असल्यास मांद्रेकरांनी पक्ष वा मुख्यमंत्र्याकडे तक्रार करावी
गोवा राज्य पुढे गेले आणि शिवोली मागे राहिले त्यांना काय चांगले ते करू द्या. कारवाईचे नंतर पाहुया. दयानंद मांद्रेकर आपल्यावर कारवाई करा असे म्हणतात ते निवडून आलेले लोकप्रतिनिधी नाही. ते आमदार नाही. ज्या दिवशी आमदार होणार त्या दिवशी पाहुया. ते पक्षाचे कार्यकर्ते आहेत तर आपणही कार्यकर्ता आहे. आपण लोकांचे कार्य करीत आहे. त्यांना जर काही अडचण असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगावे. पक्षाला सांगावे वा अन्य कुणाला. त्याबाबत आपल्यास काही लागत नाही. मी मंत्री कळंगूट मतदारसंघाचा नाही. मला मुख्यमंत्र्यानी राज्याचा मंत्री केला आहे. मी गोव्यासाठी कार्य करीत आहे. मला काही फरक पडत नाही.