27 व 30 रोजी म्हापसा व फोंडा येथे आयोजन : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील युवा स्वयंपूर्ण व्हावा या उद्देशाने सरकारतर्फे राज्यात स्वयंपूर्ण युवा मेळावे आयेजित केले जात असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. या मेळाव्यामध्ये 60 नामांकीत कंपनींचा सहभाग असणार असून सुमारे एक हजार युवकांना थेट नोकरी मिळण्याची संधी आहे. तसेच रोजगार मार्गदर्शनही केले जाईल. 27 रोजी उत्तर गोव्यातील डीएमसी कॉलेज म्हापसा तसेच 30 रोजी दक्षिण गोव्यातील जीव्हीएमएस कॉलेज फेंडा या दोन ठिकाणी सदर मेळावे आयोजित करण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत कामगार व रोजगारमंत्री जेनिफर मोन्सेरात उपस्थित होत्या. या मेळाव्यातून नोकरी व्यवसाय मार्गदर्शन केले जाईल. बँक तसेच कॉर्पोरेट विभागाचे मार्गदर्शन केले जाणार आहे. विविध सरकारी योजनांची माहिती देणारे सरकारी स्टॉलही उपलब्ध असतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
अठरा वर्षांवरील युवा-युवतांनी सहभागी व्हावे
गोव्यातील 18 वर्षांच्या वरील युवकांसाठी हे मेळावे असून त्यात अधिकाधिक युवा-युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. इच्छूक युवा युवतीनी ऑनलाईन नोंदणी करावी किंवा मेळाव्याच्या दिवशी लवकर येऊन नोंदणी करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. विविध क्षेत्रातील मान्यवर रोजगार विषयी मार्गदर्शन करतील. तसेच सरकारी आएएस अधिकारीही आएएस अभ्यासक्रमाविषयी मार्गदर्शन करतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नोकरभरती प्रक्रिया सुरू
सरकारने दहा हजार नोकऱया देण्याचे घोषित केले होते, त्यापैकी एक हजार नोकऱया देण्यात आल्या आहेत. आठ हजार नोकऱयांबाबत जाहिराती देण्यात आल्या असून नोकरभरती करणे प्रक्रिया सुरु आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.