प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य सरकारने रविवारी पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला बेळगाव शहर व तालुक्मयात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी घरी राहून सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. यामुळे नेहमी धावणारे बेळगाव शहर मात्र रविवारी शांत होते. कोठेही वाहनांची वर्दळ नव्हती, गर्दीचा गोंगाट नव्हता. सर्वत्र शुकशुकाट पसरल्याचे चित्र दिसून येत होते.
शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत असा 33 तासांचा लॉकडाऊन करण्यात आला. सरकारने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर जुलै महिन्यातील हा पहिलाच रविवार होता. औषध दुकाने, रुग्णालये, दूध विक्री या व्यतिरिक्त इतर सर्व व्यवहार बंद होते. बेळगाव शहराबरोबरच उपनगरांमध्येही व्यवहार ठप्प असल्याचे दिसून आले.
पोलिसांकडून कसून चौकशी
शहराच्या प्रवेशद्वारांवर येणाऱया-जाणाऱया वाहनचालकांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात होती. विनाकारण बाहेर फिरणाऱयांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. नेहरूनगर, हिंडलगा रोड येथील गांधी चौक, सम्राट अशोक चौक, तिसरे रेल्वेगेट, गोवावेस सर्कल, चन्नम्मा सर्कल, कॅम्प या परिसरात पोलीस वाहनचालकांची चौकशी करीत होते. विनाकारण फिरणाऱयांना दंड घालून माघारी धाडले जात होते.
छुप्या मार्गाने चिकन-मटणची विक्री
शहापूर, खासबाग, वडगाव या परिसरात छुप्या मार्गाने चिकन व मटणची विक्री जोरात सुरू होती. चिकन खरेदी करण्यासाठी खासबाग येथे नागरिकांची गर्दी होत होती. लॉकडाऊन असल्यामुळे शहरातील अनेक चिकन व मटण विपेत्यांनी दुकाने बंद ठेवली होती. परंतु काहींनी प्रशासनाचा आदेश न जुमानता दुकाने सुरूच ठेवली होती. ग्राहक आल्यावर शटर उघडून पुन्हा शटर बंद करण्याचे प्रकार घडत होते.
रुग्णांच्या नातेवाईकांची हेळसांड
रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची लॉकडाऊनमुळे हेळसांड झाली. बस बंद, रिक्षा बंद, यामुळे पायपीट करत रुग्णालय गाठावे लागत होते. काही दुचाकीचालकांना पोलिसांनी माघारी धाडल्यामुळे त्यांना रुग्णालयापर्यंत पोहोचता आले नाही. नातेवाईकांची हेळसांड होत असल्यामुळे त्यांच्यामधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
पेट्रोल पंपांवर शुकशुकाट
एरव्ही पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. रविवारी मात्र पेट्रोल पंपांवर शुकशुकाट होता. काही पेट्रोलपंप चालकांनी ग्राहकच नसल्याने पेट्रोलपंप बंद ठेवले. काही पेट्रोलपंप सुरू असूनही तेथील कामगार बसून होते. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱया व्यक्ती पेट्रोल पंपावर जावून पेट्रोल भरत होते.
रेल्वे-परिवहन सेवा बंद
रविवारच्या लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने रेल्वे व परिवहन सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रविवारी वायव्य परिवहन मंडळाने बस सेवा बंद ठेवली होती. सर्व बस मध्यवर्ती बसस्थानक येथे लावण्यात आल्या होत्या. रविवारी रेल्वे सेवाही बंद होती. यामुळे रेल्वेस्थानक परिसरात शुकशुकाट होता.
टिळकवाडी येथे व्यवहार ठप्प
टिळकवाडीमध्ये सर्व व्यवहार रविवारी ठप्प होते. रविवार असूनही नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. पहाटेपासूनच केवळ दूध व वृत्तपत्रे खरेदी करण्यासाठी नागरिक बाहेर पडले होते. त्यानंतर दिवसभर सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, महर्षि रोड, शिवाजी चौक या भागात शुकशुकाट पसरला होता.
अनगोळ नाक्यावर बॅरिकेड्स
अनगोळ नाक्मयावर पोलिसांकडून बॅरिकेड्स लावण्यात आले होते. यामुळे नेहमी गर्दीने गजबजलेला अनगोळचा मुख्य मार्ग रविवारी मात्र शांत होता. अनगोळ गावात गल्ल्या-गल्ल्यांमध्ये शुकशुकाट पहावयास मिळाला. कोरोनाबद्दलची भीती नागरिकांमध्ये असल्याने त्यांनी घरी राहून कुटुंबीयांसोबत वेळ घालविला.
वडगाव भागात व्यवहार बंद
वडगाव भागात सर्व व्यवहार रविवारी बंद होते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तरीदेखील काही महाभाग विनाकारण फिरताना दिसत होते. अशा वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. उपनगरांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यामुळे वडगावमधील नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले.
शहापूर परिसर शांत
पहिल्याच रविवारी शहापूरमधील बाजारपेठेबरोबच इतर सर्व व्यवहार ठप्प होते. मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद केली होती. नाथ पै चौक, बँक ऑफ इंडिया चौक, खडेबाजार हा दररोज गजबजलेला परिसर रविवारी मात्र शांत होता.
उपनगरांमध्येही शुकशुकाट नेहरूनगर-सदाशिवनगर या उपनगरांमध्येही शुकशुकाट होता. नागरिकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले. राष्ट्रीय महामार्गावरून येणारी वाहने वगळता नेहरूनगर मुख्य रस्त्यांवर वर्दळ नव्हती. केएलई रोडवर रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची धावपळ मात्र सुरू होती.