गुरुंच्या प्रतिमांना हार घालून पूजन : मैफलीला सरस्वती वाचनालयाचे सहकार्य : रसिकश्रोत्यांनी लुटला मैफलीचा आनंद
प्रतिनिधी /बेळगाव
सरस्वती वाचनालय, शहापूर आणि स्वरमल्हार फौंडेशनतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित संगीत सभा उत्साहात पार पडली. प्रारंभी शिष्यांनी दीपप्रज्वलन केले. त्यानंतर बेळगावातील गुरुवर्य कै. पं. रामभाऊ विजापूरे, जोशीबुवा पाच्छापूरकर, कडलास्कर बुवा, विष्णुपंत धर्माधिकारी, नारायण चिकोडी, ताम्हणकर बुवा, काळे बुवा, पुराणिक बुवा या सर्वांच्या प्रतिमांना ज्ये÷ शिष्य सुधांशू कुलकर्णी, रविंद्र माने, नंदन हेर्लेकर, मुकुंद गोरे, प्रभाकर शहापूरकर, चिदंबर तोरवी, राजप्रभू धोत्रे, रोहिणी कुलकर्णी यांनी हार घालून गुरुपूजन केले.
त्यानंतर संगीत सभेला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रातील मैफलीत नंदन हेर्लेकर यांनी राग चारुकेशी गाऊन मैफलीची सुरुवात केली. रोहिणी कुलकर्णी यांनी राग वसंतमुखारी आणि कबीर भजन प्रस्तुत केले. प्रभाकर शहापूरकर यांनी राग शुद्धसारंग आणि नाटय़गीत सादर केले. सकाळच्या सत्राच्या शेवटी डॉ. सुधांशू कुलकर्णी आणि सारंग कुलकर्णी यांची हार्मोनियम जुगलबंदी झाली. त्यांनी राग दीपमल्हार आणि नाटय़गीत सादर केले.
भजन-रागाचे उत्कृष्ट सादरीकरण
संध्याकाळच्या सत्रात शंतनू हेर्लेकर यांनी राग श्री सादर केला. रविंद्र माने यांनी राग मा आणि चित्रपट गीत सादर केले. राजप्रभू धोत्रे यांनी राग सरस्वती आणि भजन तर संजय देशपांडे यांनी राग जयंतमल्हार आणि भजन सादर केले. संगीत सभेतील सर्व कलाकारांना चिदंबर तोरवी, कृष्णा येरी, अंगद देसाई, संतोष पुरी, वैभव गाडगीळ यांनी तबला साथ आणि योगेश रामदास यांनी हार्मोनियम साथ तर हृषिकेश हेर्लेकर, महाबळेश्वर साबण्णावर, बांदिवडेकर यांनी तानपुरा साथ दिली.
रोहिणी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक, व स्वागत करून आभार मानले. कार्यक्रमाची सांगता मुकंद गोरे यांनी राग मयूरबिहाग, मालगुंजी, राग केदार आणि भैरवीने सांगता केली. मैफलीला सरस्वती वाचनालयाचे सर्व पदाधिकारी आणि सहकारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले. कोरोना काळातील सर्व नियम पाळून रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहून मैफलीचा आनंद लुटला.