भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी वर्षानिमित्त गुढीपाडव्यानिमित्त स्वरमल्हार फौंडेशनतर्फे शनिवार दि 2 रोजी सायंकाळी 5 वाजता शास्त्रीय गायनाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत फोंडा गोवा येथील हृषीकेश ढवळीकर आणि नितीन ढवळीकर हे पुत्र आणि पिता तसेच श्रीमती रेखा दिनेश, शिरसी या गायन करणार आहेत. अकॅडमी ऑफ म्युझिक, बुधवारपेठ टिळकवाडीच्या सभागृहात होणाऱया कार्यक्रमात नारायण गणाचारी, अंगद देसाई, अनय घाटे व सारंग कुलकर्णी हे कलाकार साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सर्वांना खुला असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
रेखा दिनेश, शिरसी
आवाजाची निसर्गदत्त देणगी आणि घरातूनच संगीत वारसा लाभलेल्या रेखा दिनेश यांना पंडित गणपती भट यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर विदुषी अलका देव-मारुलकर यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने पुढील शिक्षण घेतले. संगीत विद्वत् पदवीप्राप्त रेखा यांनी शास्त्रीय संगीत आणि भजन, लोकसंगीत यासारख्या सुगम गायनातही प्राविण्य मिळवून श्रोत्यांची वाहव्वा मिळविली.
त्या आकाशवाणी दूरदर्शनच्या ए श्रेणी प्राप्त कलाकार असून अनेक प्रमाणपत्र आणि पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. विविध ठिकाणच्या संगीत महोत्सवात त्यांनी आपला सहभाग दर्शविला आहे.
नितीन ढवळीकर
नितीन ढवळीकर यांचा संगीताचा वारसा लाभलेल्या घराण्यात जन्म झाल्यामुळे गायनाचे रितसर शिक्षण आई-वडिलांनी दिले. आजोबा उत्तम कीर्तनकार आणि गायक तसेच वडीलही गायक असल्याने प्राथमिक शिक्षण घरातूनच मिळत गेले. पुढे विदुषी अलका देव मारुलकर यांच्याकडून तेरा वर्षे घराणेदार गायकीची तालीम मिळाली. तसेच पंडित लक्ष्मीकांत सहकारी यांचेही मार्गदर्शन मिळाले. ग्वाल्हेर किराणा जयपूर अशा सर्व घराण्यातील सौंदर्याचा वेध घेत त्यांची गायकी आणखीनच समृद्ध झाली. शास्त्रीय संगीताबरोबरच नाटय़संगीत, भावगीत, भक्तीगीत इत्यादी प्रकारही कौशल्याने सादर करतात.
हृषीकेश ढवळीकर
मुग्धा गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हृषीकेश ढवळीकर शास्त्रीय संगीताचा अभ्यास करत आहे. वडील नितीन ढवळीकर यांचे समयोचित मार्गदर्शन त्याला लाभत आहे. त्याने गांधर्व महाविद्यालय मंडळाची प्रवेशिका प्रथम उत्तीर्ण केली असून नुकतीच प्रवेशिका पूर्ण परीक्षा दिली आहे. सुमधूर, लालित्यपूर्ण व खणखणीत आवाज तसेच कुशाग्र बुद्धीच्या जोरावर त्याने 12 वर्षे वयातच खयाल गायन व सुगम संगीत गायनामध्ये आपला ठसा उमटवला. गोवा राज्य स्तरावर आयोजित अनेक स्पर्धांमध्ये त्याने पुरस्कार मिळविले आहेत.