कोरोनाच्या प्रादुर्भावाने गेले तीन महिने सर्व काही ठप्प होते, पण आता हळूहळू सर्व गोष्टी पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत आणि आखून दिलेल्या नियमांचे पालन करून मालिकांचे चित्रीकरण पुन्हा सुरू करण्याची परवानगीसुद्धा निर्मात्यांना मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर सोनी मराठी वाहिनीने सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे योग्य ते पालन करून मुंबईतील पहिल्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. मुंबईत चित्रीकरण होणारी स्वराज्यजननी जिजामाता ही पहिली मराठी मालिका आहे.
सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. एका मुलखावेगळय़ा आईची गाथा, जिने स्वराज्याचा सिंह घडवला अशा जिजामातांच्या आयुष्यावर ही मालिका आहे. या मालिकेचे चित्रीकरण दादासाहेब फाळके चित्रनगरीत सुरू झाले आहे. सरकारने आखून दिलेले सर्व नियम पाळून या मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले आहे. संपूर्ण सेटचे सॅनिटायजेशन करण्यात आले आहे. सेटवर मास्क सक्तीचे असून नियमानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आता चित्रीकरण पार पडणार आहे. काही लोक सेटवरच राहून काम करणार असून त्यांच्या तब्येतीची काळजी घेणे ही निर्मात्या संस्थांची जबाबदारी आहे. मुंबईत चित्रीकरण सुरू होणारी ही पहिलीच मालिका आहे. ही मालिका डॉ. अमोल कोल्हे यांची असल्याने आणि ते स्वत: डॉक्टर असल्याने चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी त्यांनी स्वत: सेटवर उपस्थित राहून सर्वांना नियम समजावून सांगितले व सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर चमू यांना प्रोत्साहन दिले. तीन महिन्यांनंतर आपापल्या कामावर रुजू झाल्यामुळे सर्वच मंडळींमध्ये उत्साह होता. स्वराज्यजननी जिजामाता ही ऐतिहासिक मालिका असल्याने मिळालेल्या वेळेत कलाकारांनी आपापल्या व्यक्तिरेखेसाठी कसून तयार केली आहे. आता नियमांच्या चौकटीत राहून आपले काम व्यवस्थित करून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेचा पूर्ण चमू सज्ज झाला आहे. स्वराज्यजननी जिजामाता सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होते.