द्रमुकच्या घोषणापत्रात आश्वासनांचा भडिमार
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दविड मुनेत्र कडगमने (द्रमुक) शनिवारी स्वतःचे घोषणापत्र सादर केले आहे. चेन्नई येथली पक्ष मुख्यालयात द्रमुक अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी घोषणापत्र सादर करताना अण्णाद्रमुक सरकारकडून करण्यात आलेल्या गुन्हय़ांच्या चौकशीसाठी एक विशेष न्यायालय स्थापन करणार असल्याचे म्हटले आहे. विधानसभेचे कामकाज टीव्हीवर प्रसारित केले जाईल आणि पोंगलला राज्यव्यापी उत्सव सोहळय़ाचे स्वरुप देणार असल्याचे स्टॅलिन म्हणाले.
पेट्रोलवर 5 रुपये, डिझेलवर 4 रुपये आणि घरगुती सिलिंडरावर 100 परुयांचे अनुदान दिले जाईल. तसेच दूधाचा भाव 3 रुपये प्रतिलिटरने कमी करण्याचे आश्वासन स्टॅलिन यांनी दिले आहे. जनतेवरील इंधनदरांचा भार कमी करण्यासाठी सत्तेवर आल्यावर विशेष पावले उचलू असे द्रमुक खासदार टी. शिवा यांन ाrम्हटले आहे.
महिला सायबर प्रकरणांना हाताळण्यासाठी एक नवे सायबल पोलीस स्थानक निर्माण करण्यात येईल. चेन्नईसह सर्व महापालिकांमध्ये पाईपलाईनच्या माध्यमातून पेयजल उपलब्ध करण्याचे आश्वासन द्रमुककडून देण्यात आले आहे.
नीटवर बंदी घालणार
द्रमुकने मालमत्ता करातील वृद्धी माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच द्रमुक सत्तेवर आल्यास प्रमुख हिंदू मंदिरांमध्ये तीर्थयात्रेवर जाणाऱया 1 लाख लोकांना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत, मातृत्व रजेत वृद्धी आणि सहाय्य, इंधनातील दरकपातीसह नीटवर बंदी घालण्यासंबंधी पाऊल उचलण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
द्रमुकच्या भूमिकेत बदल
हिंदू मंदिरांचे नुतनीकरण आणि संरक्षणासाठी 1 हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. तसेच चर्च आणि मशिदींसाठी 200 कोटी रुपये प्रदान करण्यात येईल. उत्तम जलव्यवस्थापन, स्वच्छ पेयजल पुरवठा, शासकीय नोकऱयांमध्ये महिला आरक्षणात वृद्धी, वृद्धापवस्था निवृत्तिवेतन आणि भोजनालयांच्या स्थापनेचे आश्वासन स्टॅलिन यांच्याकडून देण्यात आले आहे.
तामिळनाडूत 2011 पासून सत्तेतून बाहेर असलेल्या द्रमुकने काँग्रेस, डावे पक्ष, एमडीएमके, व्हीसीके आणि अन्य छोटय़ा पक्षांसोबत आघाडी केली आहे. द्रमुकने विधानसभेच्या एकूण 234 जागांपैकी घटक पक्षांसाठी 61 जागा सोडल्या आहेत. तर काँग्रेस 25 जागांवर निवडणूक लढवत आहे. यंदाच्या निवडणुकीत द्रमुक प्रमुख स्टॅलिन हे कोलाथुर मतदारसंघातून उभे राहणार आहेत. तर त्यांचे पुत्र उदयनिधी चेपक-त्रिपलिकाने मतदारसंघातील उमेदवार असतील.
मोफत डाटासह टॅबलेट
द्रमुक सत्तेवर आल्यास पदवीधरांना शासकीय नोकऱयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. खासगी क्षेत्रातील आरक्षणाचा आग्रह धरण्यात येईल आणि अल्पभूधारक शेतकऱयांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. शासकीय शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना मोफत डाटासह टॅबलेट देण्यात येईल. याचबरोबर स्थानिक लोकांसाठी उद्योगक्षेत्रात 75 टक्के आरक्षण लागू करण्याचा कायदा आणला जाणार असल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.