लाल किल्ल्यावर बहुस्तरीय सुरक्षा, ‘कोरोना नियमावली’चे क्रियान्वयन : निमंत्रितांचीच उपस्थिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा स्वातंत्र्यदिन सोहळा फिजिकल डिस्टन्सिंगसह मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत व अधिक कडक शिस्तीत साजरा करण्यात येणार आहे. लाल किल्ल्यावर बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून जवळपास 4,000 सुरक्षा कर्मचारी लाल किल्ल्याच्या भागात गस्त घालत आहेत. याव्यतिरिक्त रेल्वे आणि रस्तेमार्गावरही सुरक्षेचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनासाठी दरवर्षी सर्वत्र जोरदार तयारी केली जाते. पण यंदा हा कार्यक्रम साधेपणातच साजरा होणार आहे.
कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशभर भीतीची छाया आहे. कोरोनामुळे रामजन्मभूमी पायाभरणी सोहळाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत्अत्यंत दक्षतापूर्वक व खबरदारीच्या उपाययोजना राबवून पार पाडण्यात आला होता. आता स्वातंत्र्यदिनावरही कोरोनाचे सावट असल्याने विशेष काळजी घेतली जात आहे. त्याकरिता दरवर्षीच्या कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आला आहे. पाहुण्यांच्या संख्येत यावर्षी कपात करण्यात आली आहे. लाल किल्ल्याच्या सभोवती दरवर्षी 400 ते 500 पाहुणे असतात. ही संख्या यंदा 150 च्या आसपासच राहणार आहे. त्यापैकी काही महनीय व्यक्तीच खुर्च्यांवर विराजमान होणार आहेत.
कोरोनामुळे जवान चार रांगेत उभे राहणार असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. तिन्ही दलांचे जवान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देतील. यात सुमारे 22 जवान तसेच अधिकाऱयांचा समावेश असेल. राष्ट्रीय सलामीत ही संख्या 32 पर्यंत सीमित राहील. सदर जवानही मास्क परिधान करून संचलन करताना दिसतील. स्वातंत्र्यदिन सोहळय़ाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारची दक्षता घेतली जाणार आहे.
‘दूरदर्शन’वर थेट प्रक्षेपण स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वप्रथम पंतप्रधान दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतील. त्यानंतर राष्ट्रगीत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील. देशवासियांना हा संपूर्ण कार्यक्रम दूरदर्शनवर पाहता येणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर होणार आहे. सकाळी साडेसहा वाजल्यापासून हे थेट प्रक्षेपण सुरू होईल. ते सर्वांना पाहता येणार आहे.