महेश मांजरेकर करणार चित्रपटाचे दिग्दर्शन
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आगामी बायोपिक ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’मध्ये विनायक दामोदर सावरकर या महान स्वातंत्र्यसेनानींची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण जूनपासून सुरू होणार आहे. याचे चित्रिकरण लंडन, महाराष्ट्रातील काही ठिकाणी आणि अंदमान-निकोबारमध्ये होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार असून संदीप सिंह यांच्याकडून याची निर्मिती होत आहे. चित्रपटात स्वातंत्र्यलढय़ातील विविध काळ दाखविले जाणार आहेत.
स्वातंत्र्यलढय़ात अनेक नायकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, परंतु यातील प्रत्येकाला हवे तितके महत्त्व देण्यात आलेले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल चुकीच्या गोष्टी पसरविल्या गेल्या. अशा नायकाची कहाणी अवश्य सांगितली जावी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची व्यक्तिरेखा साकारणे माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक आहे, असे रणदीपने म्हटले आहे.
ज्यांच्याकडे हेतुपुरस्पर डोळेझाक करण्यात आली अशा लोकांची कहाणी सांगण्याची हीच वेळ आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट आम्हाला इतिहासात डोकावण्याची एक संधी देणार असल्याचे महेश मांजरेकर यांनी म्हटले आहे.