मुक्तीदिन सोहळय़ात उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचे प्रतिपादन : काणकोणात अडीच वर्षांत एक हजार कोटींची विकासकामे
प्रतिनिधी /काणकोण
मुक्तीच्या 60 वर्षात गोव्याने शिक्षण, उद्योग-व्यवसाय, पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्रांत भरारी मारलेली आहे. पोर्तुगीजांनी काणकोण तालुका अखेरच्या क्षणी जरी ताब्यात घेतला असला, तरी काणकोण सर्वांत आधी मुक्त झाला. त्यासाठी पर्तगाळी येथील परशुराम आचार्य आणि पैंगीण येथील केशव टेंगसे यांना बलिदान द्यावे लागले. अनेक स्वातंत्र्यसैनिकांना तुरुंगवास भोगावा लागला. संसाराची राखरांगोळी करावी लागली. त्यांच्या त्यागाचे स्मरण करणे हे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे मत उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी काणकोणच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित मुक्तीदिनाच्या शासकीय समारंभात ध्वजारोहण केल्यानंतर बोलताना व्यक्त केले.
उपजिल्हाधिकारी उदय प्रभुदेसाई, मामलेदार मनोज कोरगावकर यांनी उपसभापती फर्नांडिस यांचे स्वागत केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र नाईक यांनी मानवंदना दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मार्गदर्शन व सहकार्यामुळे काणकोण मतदारसंघात मागच्या अडीच वर्षांत एक हजार कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. कोविड महामारी आली नसती, तर अनेक कामांना चालना मिळाली असती. तरी देखील ही कामे पूर्ण होण्यासाठी आपल्याला सहकार्य केलेले भाजप मंडळाचे सर्व कार्यकर्ते, पंचायती, नगरपालिका, उपजिल्हाधिकारी, मामलेदार, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खाते, पोलीस, अग्निमशामक दल, आरोग्य खात्याच्या कर्मचाऱयांबरोबरच अन्य सर्व खातेप्रमुख आणि नागरिकांविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करतो, असे ते म्हणाले.
यावेळी सेंट तेरेझा, सेंट सॅबेस्त्यांव, सेंट अँथनी, कात्यायणी बाणेश्वर, श्री मल्लिकार्जुन विद्यालय, गवळ-खोल सरकारी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संचलन केले, तर सेंट तेरेझा हायस्कूल, श्री कात्यायणी बाणेश्वर विद्यालय, श्री मल्लिकार्जुन विद्यालय, सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. पैंगीणच्या परशुराम विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी मल्लखांब प्रात्यक्षिके, इंदावाडा-गावडोंगरी येथील इंद्रेश्वर यूथ क्लबच्या युवतींनी कुणबी नृत्य, काणकोणच्या अंगणवाडी सेविकांनी एड्स विषयावर पथनाटय़, तर कात्यायणी बाणेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी राजेश देसाई याने लोकगीते सादर केली. त्यांना संगीत शिक्षक अरविंद गायक, रूपाली वेळीप, नंदकुमार च्यारी, अरविंद नाईक यांनी संगीत साथ केली.
यावेळी उपजिल्हाधिकारी कार्यालयाने सुनंदाबाई राया काळे, पुष्पा बाबुसो काणकोणकर व वसुंधरा भिकारो देसाई या स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नींचा उपसभापतींच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन गौरव केला. या समारंभाला नगराध्यक्ष सायमन रिबेलो, उपनगराध्यक्षा अमिता पागी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र देसाई, नगरसेविका सारा देसाई, डॉ. धिलोन देसाई, एपीईओ मोतीलाल देसाई, विभागीय कृषी अधिकारी कीर्तिराज गावकर, विविध खात्यांचे प्रमुख, शिक्षक, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन शिरीष पै यांनी केले.
इतरत्र काणकोण पालिकेजवळ नगराध्यक्ष रिबेलो, पैंगीणच्या श्रद्धानंद विद्यालयाजवळ माजी विद्यार्थी गुरुनाथ टेंगसे, पैंगीण पंचायतीजवळ सरपंच जगदीश गावकर, श्रीस्थळ पंचायतीजवळ सरपंच धिलोन नाईक, काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्राजवळ आरोग्याधिकारी डॉ. स्नेहा आमोणकर, खोतीगाव पंचायतीजवळ सरपंच दया गावकर यांनी ध्वजारोहण केले. मुक्तीदिनाच्या पूर्वसंध्येला काणकोणच्या सर्व पंचायतींनी चावडीवरील प्रशासकीय इमारतीपर्यंत दुचाकी फेरी काढली, तर सर्व शैक्षणिक संस्थांनी मशाल मिरवणूक काढून दिवंगत स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली.