स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सुसज्जता – पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटावरून देशाला करणार संबोधित
नवी दिली / वृत्तसंस्था
भारत आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन हे दरवर्षीप्रमाणे राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर होणार आहे. या किल्ल्याच्या तटावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करणार आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा स्वातंत्र्य दिन धुमधडाक्मयात साजरा होणार नसला तरी देशवासियांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी खूप उत्साह दिसून येत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाच्या तयारीला अंतिम स्वरूप दिले जात असतानाच देशाची राजधानी आणि खासकरून लाल किल्ल्यावर बहुस्तरीय सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
भारत देश यावर्षी 75 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी राष्ट्राला संबोधित करणार आहेत. कोरोना व्हायरस संकटात पंतप्रधान मोदींनी याआधीही अनेकदा देशाला संबोधित केले आहे. मात्र, आजच्या त्यांच्या भाषणाकडे देशवासियांचे लक्ष असणार आहे. तसेच पथसंचलन आणि काही निवडक सेवाकर्मींचा गौरव सोहळाही लक्षवेधी असणार आहे. याचदरम्यान अलिकडेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये भव्य-दिव्य कामगिरी करणाऱया भारतीय क्रीडापटूंचा गौरवही केला जाणार आहे. लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात यंदा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
लाल किल्ल्याला अभेद्य सुरक्षाकडे
लाल किल्ल्यावरची सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्यासाठी एनएसजी स्?नायपर्स, कमांडो, ड्रोन पकडणारी पथके, तसेच आजूबाजूच्या उंच इमारतींवर अचूक नेम धरून गोळी मारू शकतील असे नेमबाजही तैनात करण्यात आले आहेत. या सर्वांना लाल किल्ल्याच्या चारही बाजूंना तैनात करून इथे एक अभेद्य घेराबंदी केली गेली आहे. या व्यवस्थेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतराच्या नियमांचेही पालन करण्यात आले आहे.
350 कॅमेऱयांची सोहळय़ावर नजर
लाल किल्ल्यावर जवळपास 5,000 सुरक्षाकर्मी तैनात राहणार आहेत. तसेच प्रत्येक कानाकोपऱयावर नजर ठेवण्यासाठी 350 पेक्षा जास्त कॅमेरे लावण्यात आले आहेत. जम्मूत काही दिवसांपूर्वी झालेल्या ड्रोन हल्ल्याचा विचार करता इथे ड्रोनविरोधी प्रणालीही बसवण्यात आली आहे. लाल किल्ला प्रदेश आणि त्याच्या आसपासच्या दोन पोलीस नियंत्रण कक्षातील लोक 24 तास नजर ठेवणार आहेत.
सुरक्षेच्या कारणांसाठी म्हणून इथे पॅरा-ग्लायडर, पॅरा-मोटर्स, हँग ग्लायडर, यूएवी, मायक्रो लाईट एयरक्राफ्ट, रिमोटद्वारे चालणारी एयरक्राफ्ट, गरम हवेचे फुगे, छोटय़ा आकाराची विमाने, क्वाडकॉप्टर किंवा विमानातून पॅराजम्पिंग अशा प्रकारच्या सर्व हालचालींवर 16 ऑगस्टपर्यंत दिल्लीत बंदी घालण्यात आली आहे.