चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर साधला निशाणा
मुंबई/ ऑनलाईन टीम
राहुल गांधी यांनी कौतुकाची थाप दिली तर लगेच स्वामीनिष्टा सिद्ध करण्यासाठी, परमनिष्ठा उफाळणे स्वाभाविक आहे. खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं ? हे आपलं वागणं खरोखर कौतुकास पात्र आहे. मात्र यासाठी बलात्कारासारख्या गंभीर विषयाचे भांडवल करत आपली पोळी भाजून घेणे हे मात्र निंदनीय आहे. अशी खऱमरीत टीका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
संजय राठोडला अभय कोण देतं ? पुणे पोलिसांची याबद्दलची भूमिका संपुर्ण महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे. नवोदित अभिनेत्रीला संधी देण्याच्या अमिष दाखवत तीच्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे. तसेच महाविकास आघाडीतील अऩेक नेत्यांचे हात अशा कृत्यात बरबटले आहेत. महाराष्ट्राची जनतेने हे पाहिले आहेच. पण अशा अत्याचाराविरूद्ध सुद्धा न्याय मिळण्याकरिता आम्ही मागे असणार नाही. कारण आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत. असे म्हणत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर ही ताशेरे ओढले आहेत.
संजय राऊत काय म्हणाले होते ?
काही दिवसापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत एका बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी या पीडित कुटुंबासोबतचा फोटो ट्विट करून त्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र हा फोटो काढावा म्हणून राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला पत्रं लिहिलं आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं होते. राहुल गांधींनी पीडित कुटुंबाचा ट्विटरवर फोटो ठेवणं हा गुन्हा आहे का ?, असा सवाल संजय राऊत यांनी केला होता.
तसेच नरेंद्र मोदी हे सुद्धा निर्भयाच्या कुटुंबांना भेटले होते. भाजपचे अनेक नेतेही गेले होते. तेव्हाही ते फोटो प्रसिद्ध झाले होते. तेव्हा ते फोटो काढा असं राष्ट्रीय महिला आयोग किंवा अन्य कुणी सांगितल्याचं आठवत नाही, असं राऊत यांनी निदर्शनास आणून दिलं होते. या सगळ्या प्रकरणानंतर चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.