स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांचा विरोध
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील मारुती मंदिरपाठोपाठ इतर 6 ठिकाणे रत्नागिरी नगर परिषदेमार्फत ‘पे अँड पार्क’ म्हणून विकसित केली जाणार आहेत. मात्र स्वा. लक्ष्मी चौकातील पार्किंगला स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांनी विरोध केला आहे. त्या बाबतचे निवेदन प्रभाग 10 च्या नगरसेविका सुप्रिया संदीप रसाळ यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना दिले.
येत्या एप्रिल महिन्यापासून शहरात एकूण 7 ठिकाणी ही सुविधा सुरू होणार असल्याचे नगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंडय़ा साळवी यांनी सांगितले. नगर परिषदेला यातून वर्षाला 27 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. प्रधान पोस्ट ऑफिससमोर, जागेत साळवी स्टॉप येथे जलतरण तलावाजवळच्या मैदानात, आठवडा बाजार, स्वा. लक्ष्मी चौक, पऱयाची आळी, राम आळीतील सुपर मार्केटजवळ हे पे अँड पार्क सुरू होणार आहे. मात्र स्वा. लक्ष्मी चौकातील पार्किंगला स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांनी विरोध केला आहे.
स्वा. लक्ष्मी चौक हे प्रभाग 1, 2, 9, व 10 मधील मुलांना खेळण्यासाठी एकमेव मैदान आहे. या मैदानात विविध खेळांच्या स्पर्धा व सराव होतात. नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 1 साठी देखील हे सोयीचे मैदान आहे. हे मैदान म्हणजे विविध सभा, कार्यक्रमांसाठी ऐतहासिक ठिकाण आहे. असे मैदान पे ऍन्ड पार्किंगला देऊ नये, अशी आग्रही मागणी आहे.
भावी पिढी मैदानी खेळापासून वंचित होणार
स्वा. लक्ष्मी चौक हे मैदान ‘पे अँड पार्क’साठी दिल्यास मुलांचा खेळण्याचा हक्क हिरावून घेतल्यासारखा होणार आहे. या योजनेतून नगरपालिकेला उत्पन्न मिळेल. मात्र भावी पिढी मैदानी खेळापासून वंचित होणार आहे.
– सुप्रिया रसाळ, नगरसेविका, न.प. रत्नागिरी