केंद्र शासनाच्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यास यंत्रणा अपयशी
प्रतिनिधी/ बेळगाव
स्विटमार्ट आणि बेकरीमध्ये विक्री करण्यात येणाऱया खाद्यपदार्थांवर एक्स्पायरी डेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाकडून कोणताच आदेश जारी करण्यात आला नसल्याने स्विटमार्ट व बेकरीमध्ये खाद्य पदार्थांवर एक्स्पायरी डेट घालण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने लागू केलेल्या नियमाची अंमलबजावणी होत नसल्याने अन्न सुरक्षा व दर्जा रामभरोसे आहे.
खाद्य पदार्थांची विक्री करणे किंवा खाद्य पदार्थ बनविण्याकरीता परवानगी देण्यासाठी तसेच खाद्य पदार्थांचा दर्जा राखण्यासाठी अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकारणाची (एफएसएसए) स्थापना राज्य शासनाने केली आहे. मात्र केंद्र आणि राज्य शासनाने घातलेल्या नियमावलींची अंमलबजावणी करण्यासाठी अन्न सुरक्षा आणि दर्जा राखण्यासाठी कार्यरत असलेल्या कार्यालयात अधिकाऱयांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळेच केंद्र शासनाने लागू केलेल्या नव्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यास अन्न सुरक्षा व दर्जा प्राधिकरण मंडळ अपयशी ठरले आहे. स्विटमार्ट आणि बेकरीमध्ये तयार करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांची मागणी वाढत आहे. पण यामध्ये वापरण्यात येणाऱया विविध साहित्यामुळे खाद्य पदार्थ ठरावीक वेळेत खराब होतात. हे पदार्थ नाशवंत असल्याने खराब झाल्यानंतर खाल्यास नागरिकांना विषबाधा होऊ शकते. त्यामुळे स्विटमार्ट आणि बेकरीमध्ये तयार करण्यात येणाऱया प्रत्येक खाद्यपदार्थावर एक्स्पायरी डेट घालण्याची नियमावली केंद्र शासनाने लागू केली आहे. याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य शासनाबरोबरच खाद्य सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरण मंडळावर सोपविली आहे. सदर नियमावली लागू करून दोन महिने उलटले पण शहरातील कोणत्याच स्विटमार्टमध्ये खाद्यपदार्थांवर एक्स्पायरी डेट घातली जात नाही. याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक सुचना राज्य शासनाकडून करण्यात आली नसल्याने सदर नियमावलीचे पालन गांभिर्याने केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील हॉटेल, कॅन्टीन, स्विटमार्ट, खाद्य पदार्थ विक्री करणाऱयांसह तयार करणाऱया व्यवसायिकांना एफएसएसए कडून परवाना घेणे किंवा नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांचा दर्जा राखण्याची जबाबदारी एफएसएसए ची आहे. पण या कार्यालयाकडून आवश्यक तितके प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे स्विटमार्टमध्ये खाद्य पदार्थांवर एक्स्पायरी डेट घालण्याचा मुद्दा बारगळला आहे.
स्विटमार्टमधील खाद्यपदार्थांवर एक्स्पायरी डेट घालण्याचा आदेश केंद शासनाने जारी केला आहे. पण याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाकडून एफएसएसए ला अधिकृत आदेश देण्यात आला नाही. त्यामुळे या नियमावलीची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात नसल्याची माहिती एफएसएसए चे राजेंद्र भालकी यांनी दिली. शहरात कार्यालयाची सुरूवात अलीकडेच झाली असून, आवश्यक त्या सुविधा शासनाकडून उपलब्ध करण्यात आल्या नाहीत. अन्न सुरक्षा व दर्जा प्राधिकरण मंडळाच्या नियमावलींची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱयांची पदे रिक्त आहेत. अपुऱया कर्मचारी वर्गामुळे नियमावलींची अंमलबजावणी करताना अडचण भासत असल्याची माहिती त्यांनी दिली.