वृत्तसंस्था/ टोकियो
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत टेनिस या क्रीडाप्रकारात पुरूष एकेरीत सर्बियाचा टॉप सीडेड नोव्हॅक जोकोविच आणि जपानचा केई निशीकोरी यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचप्रमाणे रशियाच्या मेदव्हेदेवनेही शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले तर ग्रीसच्या सित्सिपसचे आव्हान तिसऱया फेरीत समाप्त झाले. महिला एकेरीत स्विटोलिनाने उपांत्य फेरी गाठली.
पुरूष एकेरीच्या बुधवारी झालेल्या सामन्यात जोकोविचने स्पेनच्या फोकिनाचा 6-3, 6-1 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. जोकोविचने 2008 च्या ऑलिंपिक स्पर्धेत कास्यपदक मिळविले होते. आता जोकोविच आणि जपानचा निशीकोरी यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. अन्य एका सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवने इटलीच्या फॉगनेनीचा 6-2, 3-6, 6-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. जपानच्या निशीकोरीने बेलारूसच्या इव्हाशेकाचा 7-6 (9-7), 6-0 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. ग्रीसच्या सित्सिपसचे आव्हान तिसऱया फेरीतच समाप्त झाले. फ्रान्सच्या हम्बर्टने सित्सिपसवर 2-6, 7-6 (7-4), 6-2 अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. हम्बर्ट आणि रशियाचा कॅचेनोव्ह यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल.
स्विटोलिना उपांत्य फेरीत
महिला एकेरीच्या विभागात युक्रेनच्या एलिना स्विटोलिनाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तिने इटलीच्या कॅमिला जॉर्जीचा 6-4, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. आता स्विटोलिना आणि व्होंड्रोसोव्हा यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल. व्होंड्रोसोव्हाने स्पेनच्या बेडोसावर विजय मिळविला. या सामन्यात व्होंड्रोसोव्हाने पहिला सेट 6-3 असा जिंकल्यानंतर बेडोसाने माघार घेतली.