प्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस : साबालेन्का, अझारेन्का, मेदवेदेव्ह, निशिकोरी, इस्नेर, सित्सिपस यांचीही आगेकूच, ऍश्ले बार्टीची माघार, बेलिंडा बेन्सिक पराभूत
वृत्तसंस्था / पॅरिस
जागतिक सहावी मानांकित एलिना स्विटोलिना, गतउपविजेती सोफिया केनिन, सेरेना विल्यम्स, ऍरीना साबालेन्का, दारिया कॅसात्किना, व्हिक्टोरिया अझारेन्का, डॅनील मेदवेदेव्ह, सित्सिपस, अलेक्झांडर व्हेरेव्ह, केई निशिकोरी यांनी प्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेची तिसरी फेरी गाठली तर अग्रमानांकित ऍश्ले बार्टीने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली.
युक्रेनच्या स्विटोलिनाने अमेरिकेच्या ऍन ली हिचा 6-0, 6-4 असा धुव्वा उडविण्यात अजिबात वेळ दवडला नाही. दुसऱया सेटमध्ये ली ने खेळ उंचावत 3-0 अशी आघाडी घेतली होती. पण स्विटोलिनाने वेगवान खेळ करीत सलग पाच गेम्स जिंकत तिसऱया फेरीतील स्थान निश्चित केले. सुमारे सव्वा तासात तिने हा सामना संपविला. गतउपविजेत्या अमेरिकेच्या सोफिया केनिनने तिसरी फेरी गाठताना आपल्याच देशाच्या हेली बाप्टिस्टवर 7-5, 6-3 अशी मात केली. तिची पुढील लढत अमेरिकेच्याच जेसिका पेगुलाशी होणार आहे. माजी विजेत्या सातव्या मानांकित सेरेना विल्यम्सला मात्र तिसरी फेरी गाठण्यासाठी संघर्ष करावा लागला. तिने मिहेला बुझारनेक्स्यूवर 6-3, 5-7, 6-1 अशी मात केली. तिची पुढील लढत डॅनिएली कॉलिन्सशी होणार आहे. 2015 नंतर सेरेनाला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.
साबालेन्का, अझारेन्काची आगेकूच
महिलांच्या अन्य सामन्यात तिसऱया मानांकित बेलारुसच्या साबालेन्काने आपल्याच देशाच्या ऍलियाक्सांड्रा सॅस्नोविचचा 7-5, 6-3 असा पराभव केला. ऍनास्तेशिया पॅव्हल्युचेन्कोव्हाशी तिची पुढील लढत होणार आहे. दहाव्या मानांकित स्विसच्या बेलिंडा बेन्सिकचे आव्हान मात्र दुसऱया फेरीत समाप्त झाले. तिला रशियाच्या दारिया कॅसात्किनाकडून 2-6, 2-6 असा पराभव स्वीकारावा लागला. पाच प्रयत्नात बेन्सिकला अजून एकदाही या स्पर्धेत चौथी फेरी गाठता आलेली नाही. माजी अग्रमानांकित व्हिक्टोरिया अझारेन्काने डेन्मार्कच्या क्लारा टॉसनवर 7-5, 6-4 अशी मात केली. अमेरिकेच्या मॅडिसन कीजविरुद्ध तिचा पुढील सामना होणार आहे. आठ वर्षापूर्वी अझारेन्काने या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. हीच तिची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
सित्सिपस, व्हेरेव्ह, इस्नेर विजयी
पुरुष एकेरीत ग्रीकच्या सित्सिपसने स्पेनच्या पेड्रो मार्टिनेझचा 6-3, 6-4, 6-3 असा पराभव केला. त्याची पुढील लढत अमेरिकेच्या जॉन इस्नेरशी होणार आहे. सित्सिपसला अजून एकदाही ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठता आलेली नाही. पण यावेळी त्याला अंतिम फेरीसाठी फेव्हरिट मानले जात आहे. इस्नेरविरुद्ध त्याने याआधीच्या तीनही सामन्यात विजय मिळविलेला असल्याने त्याचे पारडे जड असेल. जागतिक द्वितीय मानांकित रशियाच्या मेदवेदेव्हने पहिला सेट गमविल्यानंतर मुसंडी मारत अमेरिकेच्या टॉमी पॉलवर 3-6, 6-1, 6-4, 6-3 अशी मात केली. याआधी चार वेळा मेदवेदेव्हला या स्पर्धेची दुसरी फेरीही गाठता आली नव्हती. त्याची पुढील लढत रेइली ओपेल्काशी होईल. सहाव्या मानांकित जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हने पात्रता फेरीतून आलेल्या रशियाच्या रोमन सफिउलिनचा 7-6 (7-4), 6-3, 7-6 (7-1) असा पराभव केला. तिसऱया फेरीत त्याचा मुकाबला सर्बियाच्या लॅस्लो डेरेशी होईल.
निशिकोरीचा पाच सेट्समध्ये संघर्ष
नॉर्वेचा युवा खेळाडू कॅस्पर रुडने पोलंडच्या कॅमिल मॅचरॅकवर 6-3, 6-2. 6-4 असा विजय मिळविला तर जपानच्या केई निशिकोरीने रशियाच्या 23 व्या मानांकित कॅरेन खचानोव्हचा पाच सेट्सच्या झुंजीत 4-6, 6-2, 2-6, 6-4, 6-4 असा पराभव करून आगेकूच केली. पहिल्या सामन्यातही त्याला पाच सेट्स खेळावे लागले होते.
दुखापतीमुळे ऍश्ले बार्टीची माघार
महिलामधील अग्रमानांकित ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीने दुसऱया फेरीच्या सामन्यावेळी पायाच्या दुखापतीमुळे दुसरा सेट सुरू असताना माघार घेतल्याने पोलंडच्या मॅग्डा लिनेटीला तिसऱया फेरीत स्थान मिळाले. बार्टीने माघार घेतली तेव्हा तिने पहिला सेट 6-1 असा गमविला होता आणि दुसऱया सेटमध्ये 2-2 अशी बरोबरी झाली होती. 2019 मध्ये बार्टीने ही स्पर्धा जिंकली होती. पहिल्या फेरीतील सामन्यावेळीच तिला दुखापतीचा त्रास होत होता. पण तिने तो सामना जिंकून दुसरी फेरी गाठली होती. गेल्या महिन्यात इटालियन ओपनमध्येही कोको गॉफविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यावेळी बार्टीने माघार घेतली होती. तिच्या माघारीमुळे आता या स्पर्धेतून बार्टी, ओसाका व हॅलेप या पहिल्या तीन मानांकित खेळाडू बाहेर पडल्या आहेत.
बोपण्णा-स्कुगर तिसऱया फेरीत
भारताचा रोहन बोपण्णा व त्याचा क्रोएशियन साथीदार प्रँको स्कुगर यांनी पुरुष दुहेरीची तिसरी फेरी गाठताना अमेरिकेच्या फ्रान्सेस टायफो व निकोलस मॉन्रो यांच्यावर 6-4, 7-5 अशी मात केली. सुमारे सव्वातास ही लढत रंगली होती. बोपण्णा सध्या जागतिक क्रमवारीत दुहेरीत 40 व्या क्रमांकावर असून टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी तो मानांकन गुण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्यासाठी ही शेवटची स्पर्धा आहे. 10 जून रोजी असणाऱया मानांकनाच्या आधारावर ऑलिम्पिकचे स्थान निश्चित केले जाणार आहे. बोपण्णा व दिविज शरण यांच्या एकत्रित मानांकनाचा ऑलिम्पिकसाठी विचार केला जाणार आहे. महिला दुहेरीत सानिया मिर्झा व अंकिता रैना ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची शक्यता आहे.