युवा नेमबाज निना ख्रिस्तन हिचा पराक्रम, 50 मी. रायफल थ्री पोझिशनमध्ये यश
स्वित्झर्लंडची युवा नेमबाज निना ख्रिस्तन हिने शनिवारी 50 मीटर्स रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. असाका शुटिंग रेंजवर रंगलेल्या इव्हेंटमध्ये रशियन ऑलिम्पिक कमिटीच्या युलिया झायकोव्हा व युलिया कॅरिमोव्हा अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकाच्या मानकरी ठरल्या. निनासाठी टोकियो ऑलिम्पिकमधील हे दुसरे पदक आहे. गत आठवडय़ात तिने 10 मीटर्स एअर रायफल इव्हेंटमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती.
27 वर्षीय निना ख्रिस्तनने 463.9 अंकांचा नवा ऑलिम्पिक विक्रम नोंदवत येथे स्वित्झर्लंडला ऐतिहासिक यश संपादन करुन दिले. ‘मी सुवर्ण जिंकू शकले, याचा मला खास आनंद आहे. मात्र, दोन पदके जिंकून मायदेशी परतण्याचा विचार यापूर्वी कधीच केला नव्हता. एका वेळी एकाच इव्हेंटवर लक्ष केंद्रित करणे, हाच माझा प्राधान्यक्रम असतो’, असे निना ख्रिस्तन याप्रसंगी म्हणाली.
असाका शुटिंग रेंजवरील या यशामुळे ती 1920 नंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये एकापेक्षा अधिक पदके जिंकणारी पहिलीच स्विस ऍथलिट देखील ठरली. यापूर्वी ऍन्टवर्प 1920 ऑलिम्पिकमध्ये असा पराक्रम नोंदवला गेला होता. रशियन ऑलिम्पिक कमिटीचे (आरओसी) प्रतिनिधीत्व करत असलेल्या युलिया झायकोव्हाविरुद्ध फायनल लढतीदरम्यान 10.2 स्कोअरिंग केल्यानंतर निनाचे यश निश्चित झाले आणि तिने आपला आनंदही तेथे साजरा केला. झायकोव्हा शेवटच्या प्रयत्नात 9.5 पर्यंत पोहोचू शकली. तिचा एकत्रित स्कोअर 461.9 इतका राहिला.
आरओसीची आणखी एक नेमबाज युलिया कॅरिमोव्हा एकाच इव्हेंटमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर ऑलिम्पिकचे सुवर्णही जिंकण्याच्या इराद्यात होती. मात्र, तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तिचा एकत्रित स्कोअर 450.3 इतका राहिला.