ब्रिटनच्या न्यायालयाचा दणका : कर्जपरतफेडीला मुदतवाढ देण्यास नकार : लंडनच्या घरातून बाहेर काढण्याचे आदेश
लंडन / वृत्तसंस्था
मद्यसम्राट विजय मल्ल्यासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला लंडनमधील आलिशान घरातून बाहेर काढण्याचे आदेश ब्रिटनच्या न्यायालयाने दिले आहेत. स्विस बँक युबीएसकडून मल्ल्याच्या घराचा ताबा घेतला जाणार आहे. उच्च न्यायालयाने याप्रकरणी गेल्या आठवडय़ात मल्ल्याच्या कोटय़वधी पौंडांच्या आलिशान घराचा ताबा देण्याच्या आदेशाला स्थगिती द्यायची की नाही, यावर निर्णय राखून ठेवला होता. त्यावर आता ब्रिटनच्या न्यायालयाने निर्णय दिला आहे.
मल्ल्याच्या कुटुंबाला कर्जाची परतफेड करण्यासाठी आणखी वेळ देता येणार नसल्याचे स्पष्टीकरण ब्रिटनच्या न्यायालयाने दिले आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीअंती न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले. न्यायालयाने विजय मल्ल्यासह त्याचा मुलगा सिद्धार्थ आणि आई ललिता यांना लंडनमधील हे घर ताबडतोब सोडण्याचे आदेश दिले आहेत. भारतातून फरार झाल्यापासून मल्ल्या हा लंडनमधील याच घरात वास्तव्याला असून ब्रिटिश व्हर्जिन आयलंड येथे नोंदणीकृत कंपनीची या घरावर मालकी आहे. 2012 मध्ये हे घर मल्ल्याने पाच वर्षे मुदतीचे 2.04 कोटी पौंडाचे कर्ज मिळविण्यासाठी युबीएसकडे गहाण ठेवले होते. 25 मार्च 2017 ला कर्जाची मुदत उलटूनही परतफेड न झाल्याने युबीएसने न्यायालयात दावा दाखल केला होता. अनेक प्रकारच्या दिरंगाईनंतर अखेर युबीएसच्या बाजूने कौल आला आहे. या निकालाने भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून फरार झालेल्या विजय मल्ल्याला ब्रिटनच्या न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे.
बँक फसवणूक प्रकरणी 2017 साली पहिला खुलासा करण्यात आला. मद्य व्यावसायिक आणि किंगफिशर विमान कंपनीचा मालक असलेल्या विजय मल्ल्याने आयडीबीआय आणि अन्य काही बँकांचे मिळून 9 हजार कोटींचे कर्ज बुडवल्याचे उघड झाले. त्यानंतर पळून गेलेला विजय मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्यास आहे. मल्ल्याला भारताकडे सोपविण्यात यावे, यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न चालू आहेत.