वृत्त संस्था/ रिगा (लॅटव्हिया)
येथे सुरू असलेल्या फिडेच्या ग्रॅण्ड स्वीस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रॅण्डमास्टर के. शशीकिरणने अन्य चार बुद्धिबळपटूसमवेत 4.5 गुणांसह संयुक्त आघाडी मिळविली. सहाव्या फेरीतील लढतीत शशीकिरणने रशियाचा ग्रॅण्डमास्टर प्रिडेकीचा पराभव करत पूर्ण गुण वसूल केला.
या स्पर्धेत के. शशीकिरण, फिरोजा, शिरोह, नेजेर आणि लेग्रेव्ह हे बुद्धिबळपटू प्रत्येकी 4.5 गुणांसह संयुक्त आघाडीवर आहे. सातव्या फेरीत के. शशीकिरणचा सामना लेग्रेव्हशी होणार आहे.
महिलांच्या विभागात भारताची महिला ग्रॅण्डमास्टर द्रोणावली हरिकाने जॉर्जियाच्या निनो बरोबरचा सामना बरोबरी राखत अन्य सहा स्पर्धकांसमवेर गुणतक्त्यात संयुक्त तिसऱया स्थानावर आहेत. पुरूषांच्या विभागात भारताच्या निहाल सरीनला झेक प्रजासत्ताकच्या नेव्हाराने बरोबरीत राखले. सहाव्या फेरीअखेर सरीनने 4 गुण मिळविले आहेत. तो गुणतक्त्यात अन्य 15 स्पर्धकांसह संयुक्त दुसऱया स्थानावर आहे. पी हरिकृष्णाने खुल्या विभागात 3.5 गुण नोंदविले आहेत.
सहाव्या फेरीतील अन्य एका पटावर झालेल्या लढतीत साधवानीने डी.गुकेशचा 59 व्या चालीत पराभव केला. रशियाच्या सेरेनाने भारताच्या प्रग्यानंदचा पराभव केला. महिलांच्या विभागात हरिकाला आर. वैशालीने बरोबरीत रोखले. पण वंतिका अगरवाल, पद्मिनी राऊत आणि दिव्या देशमुख यांना हार पत्करावी लागली. या स्पर्धेत भारताचे 10 पुरूष आणि 5 महिला बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतील आघाडीचे पहिले दोन स्पर्धक 2022 साली होणाऱया कॅडीडेट्स बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरतील.