रस्त्यांवर जाळपोळ, दगडफेक : 10 जण अटकेत
वृत्तसंस्था/ माल्मो
स्वीडनच्या माल्मो शहरात शुक्रवारनंतर शनिवारीही दंगली झाल्या आहेत. पोलिसांनी शनिवारी कठोर भूमिका घेत दंगलखोरांना हुसकावून लावले आहे. हिंसाचाराप्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली आहे. तर स्वीडनमधील दंगलीचे लोण आता नॉर्वेतही पोहोचले आहे. तेथेही धार्मिक गट परस्परांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.
डेन्मार्कमधील विशिष्ट धर्मविरोधी नेते रास्मुस पालुदान हे माल्मो येथे सभा घेऊ पाहत होते. परंतु प्रशासनाने सभेला अनुमती नाकारल्यानंतर पालुदान यांचे समर्थन आणि विरोधी गटादरम्यान हिंसक झटापट झाली आहे.
पालुदान यांचे समर्थक आणि दुसऱया गटामधील हिंसेदरम्यान पोहोचलेल्या पोलिसांवरच हल्ला करण्यात आला आहे. काही पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल आणि दहशतवादविरोध दल तैनात करण्यात आले आहे. तपासादरम्यान 10 जणांना अटक करण्यात आली आहे.
पालुदान हे डेन्मार्कचे कट्टरवादी नेते आहेत. त्यांना एका विशिष्ट धर्माच्या विरोधातील नेते मानले जाते. पालुदान यांनी सभा घेतल्यास शहरात तणाव आणि हिंसाचार फैलावण्याची भीती असल्याने प्रशासनाने अनुमती नाकारली होती. या निर्णयामुळे पालुदान यांचे समर्थक नाराज झाले आणि त्यांनी हिंसाचार सुरू केला होता.
स्वीडन सरकारने पालुदान यांना दोन वर्षांसाठी प्रवेश नाकारला आहे. पालुदान यांच्या सभांमध्ये मोठय़ा संख्येत लोक जमतात. पालुदान यांचे भाषणही प्रक्षोभक असते. माल्मो हे स्वीडनमधील तिसरे सर्वात मोठे शहर आहे. या शहराची लोकसंख्या सुमारे 3 लाख 20 हजार आहे. बहुतांश लोकसंख्या विदेशी वंशीयांची आहे.