मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना चाचणीवेळी चुकीचा पत्ता, बोगस मोबाईल क्रमांक देण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अशा रुग्णांचा शोध घेऊन इस्पितळात दाखल करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी स्वॅब तपासणी होणाऱयांच्या मतदार ओळखपत्र, आधारकार्ड किंवा योग्य पत्ता असणारे एखादे प्रमाणपत्राची पडताळणी करावी. शिवाय मोबाईलवर क्रमांक नोंद करताना ओटीपी क्रमांकाची पडताळणी करावी, अशी सूचना अधिकाऱयांना दिली आहे.
बेंगळूर पूर्व, पश्चिम आणि यलहंका विभागातील वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकाऱयांच्या बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांनी ही सूचना केली आहे. बेंगळूर शहरात 39 हजार कोरोना रुग्णांपैकी 4,500 रुग्ण कोठे आहेत, याचा अद्याप शोध लागलेला नाही. या रुग्णांनी चुकीचा पत्ता आणि फोन नंबर दिल्यामुळे त्यांच शोध लागलेला नाही, अशी माहिती आरोग्य अधिकाऱयांनी दिली. त्यामुळे येडियुराप्पा यांनी स्वॅब तपासणीसाठी घेताना संबंधित व्यक्तीचा पत्ता असणारे एखादे ओळखपत्र जमा करावे. तसेच मोबाईल क्रमांक नोंदविताना ओटीपी क्रमांक पडताळून खातरजमा करून घ्यावी. त्यामुळे अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांशी संपर्क साधून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात कोणतीही समस्या निर्माण होणार नाही, असे येडियुराप्पा यांनी सांगितले.