प्रतिनिधी /बेळगाव :
कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, संपूर्ण शहरात औषध फवारणी करणे महापालिकेच्या आवाक्मयाबाहेर आहे. त्यामुळे रोगप्रतिबंधक औषध फवारणीसाठी काही सामाजिक संघटना पुढे येत आहेत. याचप्रमाणे महाद्वार रोड येथील समाजसेवक संजय वालावलकर यांनी स्व खर्चाने आपल्या परिसरात रोगप्रतिबंधक औषध फवारणी केली.
औषध फवारणी करण्याची मागणी सर्वत्र होत आहे. त्यामुळे महापालिकेला प्रत्येक ठिकाणी धावपळ करावी लागत आहे. काही संघटनांनी आपल्या परिसरात औषध फवारणीचा उपक्रम हाती घेतला आहे. महाद्वार रोड-कपिलेश्वर रोड परिसरात औषध फवारणी करण्यासाठी समाजसेवक संजय वालावलकर यांनी आपल्या पाठीवर पंप घेऊन ही सेवा सुरू केली आहे. सध्या सर्वत्र कोरोना विषाणूंचा प्रसार झपाटय़ाने होत असल्याने कपिलेश्वर मंदिर परिसर, कपिलेश्वर रोड, रामामेस्त्री अड्डा, संभाजी गल्ली, महाद्वार रोड अशा आजुबाजुच्या परिसरात औषध फवारणी केली. कपिलेश्वर परिसर मंदिरात नागरिकांची गर्दी जास्त असल्याने तसेच या रस्त्यावरून नागरिकांची ये-जा सुरू आहे. त्यामुळे वालावलकर यांनी स्वत:च हा उपक्रम राबवून सुरक्षेच्यादृष्टीने दक्षता घेतली. त्यांच्या उपक्रमाबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. वालावलकर यांनी या पूर्वीदेखील विविध उपक्रम राबविले आहेत. गरजुंना शैक्षणिक साहित्य पुरविणे, शाळेची फी भरणे किंवा गरज भासल्यास गणवेश देणे अशा प्रकारची समाजसेवा त्यांनी केली आहे. आईच्या स्मरणार्थ एका गरीब मुलीच्या महाविद्यालयीन शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. याअंतर्गत गेल्या तीन वर्षापासून विद्यार्थिनीचे महाविद्यालयीन फी भरत असतात. पूर परिस्थितीवेळी गरजूंना अनमोल सहकारी सोसायटीच्या सहकार्याने रेशन धान्यपुरवठा करण्याची मोहीम राबविली होती. सध्या गरजूंना विविध मदत करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.