गावात सात दिवस होणार कडक लॉकडाऊन : आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांनी केली नागरिकांच्या आरोग्याची तपासणी
वार्ताहर / किणये
हंगरगे गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यामुळे गावातील नागरिकांनी मंगळवार दि. 18 पासून स्वयंस्फूर्तीने कडक लॉकडाऊन केला आहे. या लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद मिळत असून आपल्या गावातून कोरोनाला हद्दपार करण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे. आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांनी मंगळवारी दिवसभर गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली.
ग्रामीण भागात सर्दी, ताप, खोकला आदी आजाराचे प्रमाण वाढलेले आहे. त्यातच हंगरगे गावात एक कोरोना रुग्ण आढळून आला असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी इतरही संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी व गावामधील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित रहावे. यासाठी दोन दिवसांपूर्वी महालक्ष्मी मंदिरात पंचकमिटी, ग्रा. पं. सदस्य आदींनी बैठक घेऊन मंगळवारपासून 7 दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा ठराव एकमताने केला. याबाबत गावात दवंडी देऊन जनजागृतीही करण्यात आली होती.
मंगळवारी सकाळपासून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपापली दुकाने बंद ठेऊन लॉकडाऊनला प्रतिसाद दिला आहे. पंचांनी बैठकीत केवळ आजारी व्यक्तीला दवाखान्यात जाता-येता येते. तसेच औषध आणण्यासाठी जाता येते. जनावरांना चारा आणण्यासाठी मुभा दिली असून या व्यतिरिक्त कोणीही बाहेर जाऊ नये व बाहेरील व्यक्तींनी गावात प्रवेश करू नये, असे ठरविण्यात आले आहे.
विनामास्क फिरणाऱयांना आकारणार दंड
तसेच विनामास्क फिरणाऱयांना दंड आकारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. हा लॉकडाऊन नागरिकांच्या आरोग्यासाठी असून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी असल्याने आता येणारे सात दिवस लॉकडाऊनला प्रतिसाद देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
मंगळवारी सकाळी कृष्णा हुंदरे, दिलीप कांबळे, बाळू पाटील, विष्णू सोनोलकर, गोपाळ गोडसे, कृष्णा पाटील, विशाल सावंत, यल्लाप्पा पाटील, निवृत्ती तळवार, जयवंत पाटील, मल्लाप्पा पाटील, बाळू गोडसे, जानबा बेळगावकर, हणमंत पाटील, राजू पाटील, अर्जुन पाटील, उमेश गोडसेसह प्रमुखांनी गावात फेरफटका मारून लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन केले. गावात आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांकडून कोरोनाबाबत जनजागृती केली असून संशयित रुग्णांची आरोग्य तपासणी केली. यावेळी आरोग्य खात्याचे अधिकारी सुलोचना कुलकर्णी, राजेश्वरी नरगुंड, लियाकल शेख, एस. आय. बदोडेकर, आशा कार्यकर्त्या एस. वाय. नाईक, शालिनी पाटील, नंदा पाटील, तलाठी मंजुनाथ तिपोजी उपस्थित होते.