वार्ताहर/यमकनमर्डी :
जवळील हंचिनाळ गावात अलिकडेच एकाचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यानंतर गावातील 150 जणांचा 8 ऑगस्ट रोजी स्वॅब घेण्यात आला होता. बुधवार दि. 12 रोजी त्याचा अहवाल आला असून गावातील 34 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या सर्व बाधितांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून घरीच उपचार सुरू आहे. तर यमकनमर्डी आणि दड्डी येथेही प्रत्येकी 1 रुग्ण आढळला असून त्यांच्यावर बेळगावात उपचार सुरू आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी उदय कुडची यांनी दिली.
अचानक 34 जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच अजून काही अहवालांची प्रतीक्षा आहे. त्यामुळे आणखी किती रुग्ण पॉझिटिव्ह आढळणार ते पहावे लागणार आहे. दरम्यान, आरोग्य खात्याचे कर्मचारी आणि ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱयांमार्फत गावात जागृती करण्यात आली असून घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच खबरदारी म्हणून गावातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. एकाएकी 3 हजार लोकसंख्येपैकी 34 जणांना बाधा झाल्याने ग्रामपंचायत, आरोग्य खाते आणि आशा कार्यकर्त्यांसमोर अनेक प्रश्न ठाकले आहेत.
यावेळी ग्रामविकास अधिकारी लक्ष्मीनारायण, वैद्याधिकारी श्रीमती विद्या ऐगळी, ज्येष्ठ आरोग्य साहाय्यक आर. एम. सनदी, संजू कोळी, प्रज्वल कोचरिकर यांच्यासह अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.