ग्रामीण जीवन दर्शनाचा आगळावेगळा उपक्रम : शाळेतील विद्यार्थ्यांकडून जिवंत देखावे सादर
वार्ताहर /कडोली
राज्य शासनाच्या ओदू कर्नाटक अंतर्गत हंदिगनूर येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या मुला-मुलींनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हरवत चाललेल्या प्राचीन संस्कृतीचे हुबेहुब सादरीकरण करून एक आगळावेगळा उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
तंत्रज्ञानाच्या युगात हरवत चाललेली भारतीय संस्कृती, संस्कार पुन्हा एकदा प्रस्थापित करून देशाच्या संस्कृतीचे, चांगल्या रुढी-परंपरांचे जतन करण्यासाठी तसे विचार शालेय जीवनातच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे आवश्यक बनले आहे. याचा विचार करून हंदिगनूर येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेने ओदू कर्नाटक अंतर्गत ग्रामीण जीवन दर्शन असा एक आगळावेगळा उपक्रम राबविला.
या उपक्रमाद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांनी जिवंत देखाव्यांतून पूर्वीचे ग्रामीण जीवन अगदी तंतोतंत उभे केले होते. त्यामध्ये शेती व्यवसायाशी निगडीत शेत नांगरणे, भाताला वारे देणे, मुसळीने भात सडणे, सुपाने पाखडणे, गाईची धार काढणे, पाटा-वरवंटय़ाने मसाला वाटणे, रवीने दही घुसळून ताक, लोणी काढणे, जात्यावर धान्य दळणे, विहिरीवर रहाटाने पाणी शेंदणे, कोंबडी बाजार, मंदिरात चालणारे भजन, मंदिरासमोरचे कीर्तन, झिम्मा-फुगडी, जात्यावर धान्य दळताना ओव्या गाणे तसेच धनगरवाडय़ावरची धनगरांची बैठक इत्यादी अनेक जिवंत देखाव्यांतून आणि पूर्वीच्या पेहरावांतून सुंदर असे ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांमधून उत्साह ओसंडून वाहत होता. शिवाय गावकऱयांतूनही या उपक्रमाबद्दल समाधानाच्या प्रतिक्रिया उमटत होत्या.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका एन. के. शेख, आर. एन. किल्लेकर, पी. एस. कोलेकर, एम. एम. नांगरे, एस. व्ही. कुंभार यांनी परिश्रम घेतले. शिवाय शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील आणि कमिटीचे सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळेने राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.