वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हंसिनी मदन राजनने अम्मान येथे झालेल्या आयटीटीएफ होप्स अँड चॅलेंज टेबल टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावताना टोकियो ऑलिम्पिकमधील सर्वात युवा खेळाडूचा बहुमान मिळविलेल्या सिरीयाच्या हेन्ड साझाचा पराभव केला.
12 वर्षांखालील वयोगटाच्या अंतिम लढतीत हंसिनीने साझाचा 11-6, 11-8, 6-11, 11-6 असा पराभव केला. मुलांच्या एकेरीत भारताच्या पार्थ प्रभाकरने भाग घेतला होता. या विभागात इराणच्या कोमील निकनेजाद दिवशालीने जेतेपद मिळविले. आशियाई टेबल टेनिस युनियनतर्फे आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरासाठी हंसिनी आणखी काही काळ अम्मानमध्येच राहणार आहे. अंतिम लढत ही या स्पर्धेतील सर्वात कठीण लढत असल्याचे हंसिनी म्हणाली. तिच्यासोबत या स्पर्धेसाठी तिची आई व प्रशिक्षक ममता प्रभू आल्या आहेत. ममता प्रभू या माजी भारतीय खेळाडू आहेत.
गेल्या ऑक्टोबरमध्येही मस्कत येथे झालेल्या आयटीटीएफ वर्ल्ड युथ सिरीजमध्ये 13 वर्षांखालील वयोगटात हंसिनीने जेतेपद पटकावले होते. त्याआधी सप्टेंबरमध्ये टय़ुनिशियात झालेल्या युथ सिरीजमध्ये तिने पहिल्यांदा जेतेपद मिळविले होते. अचंता शरथ कमलचे वडील श्रीनिवास राव व काका मुरलीधर राव प्रशिक्षक यांच्याकडून ती प्रशिक्षण घेत आहे. अम्मानमधील शिबिरानंतर हंसिनी भारतात परतणार असून नंतर ती राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेणार आहे.