तालिबान-पाकिस्तानला मोठा झटका
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यावर पाकिस्तानच्या हातचे बाहुले असणारी दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कला मोठा झटका बसला आहे. तालिबान राजवटीत गृहमंत्री असलेला हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या सिराजुद्दीन हक्कानीचा मुख्य सैन्य रणनीतिकार आणि काबूलचा कमांडर हमदुल्ला मुखलिस एका भीषण आत्मघाती हल्ल्यात मारला गेला आह. काबूलवर कब्जानंतर हमदुल्लाच सर्वप्रथम अध्यक्ष अशरफ गनी यांच्या कार्यालयात शिरला होता. गनी यांच्या खूर्चीवर बसलेल्या हमदुल्लाची छायाचित्रे व्हायरल झाली होती.
हमदुल्ला तालिबानच्या स्पेश फोर्स बद्री बिग्रेडचा कमांडर होता. याच ब्रिगेडला काबूलच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. तालिबानी कमांडरच्या मृत्यूमुळे हक्कानी नेटवर्कला मोठा झटका बसला आहे.
या हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कुठल्याच दहशतवादी गटाने स्वीकारलेली नाही, पण हा आत्मघाती हल्ला इस्लामिक स्टेटने घडवून आणल्याचे मानले जातेय. इस्लामिक स्टेटचे दहशतवादी स्वतःच्या पहिल्या सर्वात महत्त्वपूर्ण टार्गेटची हत्या करण्यास यशस्वी ठरले आहेत. हमदुल्लाच्या हत्येमुळे तालिबानी नेतृत्व निश्चितच हादरले असेल.