सागवे येथील कात्रादेवीचा यात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा
वार्ताहर / राजापूर
केवळ राजापूरच नव्हे तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हय़ातील असंख्य भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या आणि भक्तांच्या नवसाला पावणारी, अशी ख्याती असलेल्या राजापूर तालुक्यातील सागवे, कात्रादेवीवाडी येथील श्री कात्रादेवीचा जत्रोत्सव गुरूवारी अत्यंत साध्या पध्दतीने पार पडला. दरवर्षी यात्रेदिवशी कात्रादेवी मंदिराचा परिसर विविध दुकाने आणि भाविकांनी फुलून जायचा यावर्षी मात्र याठिकाणी शुकशूकाट होता.
राजापूर शहरापासून सुमारे 35 कि.मी. अंतरावर वसलेल्या सागवे येथील कात्रादेवीवाडी येथे कातळावर श्री कात्रादेवीचा वास आहे. दरवर्षी पौष वैद्य सप्तमीला श्री कात्रादेवीची राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा भरते. यात्रेच्या अगोदर आठ दिवस म्हणजेच पौष पौर्णिमेला कार्यक्रमाची सुरूवात होते. या दिवसात विविध धार्मिक व पारंपारिक कार्यक्रम होत असतात. यात्रेदिवशी सकाळी देवीची पुजाअर्चा झाली की साधारणतः आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत यात्रा ही कात्रादेवीवाडी येथील कात्रादेवीच्या मंदिरात भरते.
त्यावेळी देवीची ओटी भरण्यासाठी भाविकांची विशेषतः महिलांची गर्दी होत असते. त्यानंतर साधारणपणे दुपारी चार वाजता देवी मंदिरापासून सुमारे एक ते दोन कि.मी. अंतरावर ज्या ठिकाणी ही यात्रा मोठय़ा प्रमाणावर भरते त्या ठिकाणी जाण्यासाठी वाजत गाजत निघते. यात्रास्थळी गेल्यावर पुर्वापार चालत आलेले अनेक विधी केले जातात व मखरामध्ये देवीची स्थापना केली जाते. पूजाअर्चा झाल्यावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी लोटते.
दरवर्षी लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. सायंकाळी सुरू झालेली ही यात्रा पहाटे पर्यंत चालते. राजापूर तालुक्यातील खेडय़ापाडय़ातून या यात्रेसाठी भाविक येतातच परंतु रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, मुंबई तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून श्री कात्रादेवीचे भक्त येतात. यात्रेच्या ठिकाणी येण्यासाठी राजापूर तसेच देवगड, विजयदुर्ग आगारातून दिवसभर एसटीची सोय करण्यात येते. विशेषतः रात्री भरणारी आणि राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. यावर्षी गुरूवारी कात्रादेवीची यात्रा पार पडली. मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देवस्थानने उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करतानाच यात्रेसाठी येणाऱया दुकानांना मज्जाव केल्याने यावर्षी कात्रादेवी विराजमान होते, तो माळरान सुना सुना भासत होता. यात्रेदिवशी विविध दुकाने आणि हजारो भाविकांनी गजबजणाऱया या परिसरात यावर्षी मात्र शुकशूकाट होता. दर्शनासाठी येणाऱया भाविकांची गर्दीही कमी होती. भाविकांच्या सोयीसाठी त्याठिकाणी आरोग्य तपासणी पथक तैनात ठेवण्यात आले होते.