वृत्तसंस्था/ चेन्नई
कोरोनाचा मोठा फटका क्रीडा क्षेत्राला बसला असून अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून काही स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. अशातच संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले असून या कालावधीत सर्वच क्रीडा स्पर्धासह प्रशिक्षण वर्गही बंद आहेत. पण, टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व फिरकीपटू आर.अश्विन यांनी अनोखा फंडा वापरत ऑनलाईन कोचिंगद्वारे देशातील खेळाडूंना क्रिकेटचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. धोनी व अश्विनच्या प्रशिक्षण अकादमीतर्फे हे प्रशिक्षण दिले जात आहे.
देशातील लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकजण निरनिराळे प्रयोग राबवत आनंदी राहण्याचा प्रयत्न करत आहेत. काही क्रिकेटपटू घरी जीममध्ये फिटनेसचा सराव करत आहेत, काही मिळालेल्या सुटीचा आनंद उपभोग आहेत. मात्र, धोनी व अश्विन यांनी आपल्या अकादमीतर्फे देशातील लहान मुलांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. फेसबुकवरून लाईव्ह प्रशिक्षक वर्ग भरवला जात आहे. धोनी स्वतः क्लासमध्ये प्रशिक्षण देत नसला, तरी त्याच्या अकादमीतील प्रशिक्षक खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत. धोनीच्या अकादमीचे मुख्य प्रशिक्षक सत्रजीत लाहिरी यांनी सांगितले की, प्रत्येक प्रशिक्षण वर्गाच्या व्हिडीओला 10,000 पर्यंत लाईक्स मिळत आहेत व याचा युवा खेळाडूंना मोठा फायदा होत आहेत. तसेच अकादमीमध्ये प्रशिक्षण घेणारे खेळाडू ‘क्रिकेटोर’ या ऍपचा वापर करत आहेत. या ऍपद्वारे त्यांना लाईव्ह व्हिडिओ टाकण्यात येतात तसेच खेळाडूही आपल्या सरावाचा व्हिडिओ या ऍपमध्ये शेअर करत असल्याने त्यांना मार्गदर्शन करणे सोपे जात असल्याचे लाहिरी यांनी सांगितले.
अश्विनच्या अकादमीचा खेळाडूंना फायदा
चेन्नईस्थित रविचंद्रन अश्विन आपल्या अकादमीमध्ये विद्यार्थ्यांशी स्वत: संवाद साधत आहे. या ऑनलाईन ट्रेनिंगला चांगला प्रतिसादही मिळत आहे. विशेष म्हणजे, झूम व्हिडिओ कॉलिंग तसेच गुगल क्लासरुमद्वारे तो लहान मुलांना क्रिकेटचे धडे देत आहे. आतापर्यंत, सात हजारहून अधिक लहान मुलांनी या ऑनलाईन ट्रेनिंगचा फायदा घेतला असल्याचे अश्विनने सांगितले. लॉकडाऊनच्या काळात लहान मुलेही या ऑनलाईन ट्रेनिंगचा फायदा घेत घरीच सरावावर भर देत असल्याचे पहायला मिळत आहे.