वार्ताहर/ बुगटेआलूर
हडलगा (ता. हुक्केरी) येथील मुंबईवरून आलेल्या त्या क्वारंटाईन युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भागात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाने गावास भेट देऊन त्याच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन केले आहे. 24 रोजी याच व्यक्तीचे स्वॅब घेण्यासाठी त्याला दुचाकीवरून नेण्यात आल्याने ग्रामस्थांनी भीती व्यक्त केली होती. ती अखेर खरी ठरली.
याबाबत अधिक माहिती अशी की, हडलगा येथील 32 वर्षीय युवक मुंबई येथे कामानिमित्त राहत होता. मात्र लॉकडाऊनमुळे त्याला गावाकडे तत्काळ परतणे जमले नाही. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर 18 मे रोजी तो आपल्या पत्नीसह हडलग्यास परतला. येथे त्याला व त्याच्या पत्नीला सरकारी मराठी शाळेमध्ये क्वारंटाईन करण्यात आले. या युवकास रात्रीच्यावेळी ताप येत असल्याची सूचना आशा कार्यकर्त्यांनी वैद्याधिकाऱयांना दिली. त्यानुसार 24 रोजी वैद्याधिकाऱयांचे पथक हडलग्यातील क्वारंटाईन केंद्राऐवजी बुगटेआलूरच्या प्राथमिक केंद्रात आले व या युवकास तेथे दुचाकीवरून बोलावून घेऊन त्याचा स्वॅब घेतला. यावेळी गावकऱयांनी प्रशासनाच्या या हलगर्जीपणाबद्दल जाब विचारत अधिकाऱयांना धारेवर धरले. त्यामुळे 24 रोजी रात्रीच या युवकाला हुक्केरीतील तालुका केंद्रात व त्यानंतर पुढील दिवशी बेळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
रविवार 31 रोजी या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळताच प्रशासनाने या युवकाची पत्नी व स्वॅब देण्यासाठी सोबत गेलेल्या दुचाकीस्वाराला क्वारंटाईन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वीच या कोरोनाबाधित युवकाच्या पत्नीसह हडलगा क्वारंटाईन केंद्रात असलेल्या 11 जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व होम क्वारंटाईनना भेट देऊन घरीच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
परिसरात भीतीचे वातावरण
हडलगा हे हुक्केरी तालुक्यातील पश्चिम टोकावरील गाव आहे. या तालुक्याचा प्रामुख्याने गडहिंग्लजसह इतर गावांशी जास्त संपर्क आहे. गडहिंग्लज तालुक्यात आतापर्यंत 64 हून अधिक कोरोना रुग्ण सापडले असले तरी बुगटेआलूर परिसरात प्रथमच कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने सर्वांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
हुक्केरी तालुक्यात 3 रुग्ण
हुक्केरी : हुक्केरी तालुक्यातील तीन गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याचे शासनाच्या रविवारच्या मेडिकल बुलेटिनमधून स्पष्ट झाले. तालुक्यातील धोंडगट्टी, दड्डी व हडलगा येथील हे रुग्ण आहेत. काही दिवसांपूर्वी धोंडगट्टी येथे कोरोनाबाधित आढळलेल्या महिलेल्या दिराचादेखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वरील तिघांचे अहवाल येताच प्रशासनाने या तिघांच्या संपर्कात आलेल्या एकूण 12 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीस सुत्रांनी दिली.