मॅनहॅटनमध्ये उद्योजकाचा अनोखा प्रकल्प
अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योजक बॅरी डिल्लर यांनी स्वतःच्या शहरातील लोकांना मोठी भेटवस्तू दिली आहे. त्यांनी न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन येथील हडसन नदीवर एक तरंगणारे पार्क तयार केले आहे. हडसन रिव्हर पार्क प्रकल्पासाठी बॅरी यांच्या फैंडेशनला 260 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 1900 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
बॅरी हे अमेरिकेतील आघाडीचे उद्योजक मानले जातात. हॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्माता कंपन्या म्हणजेच पॅरामाउंट पिक्चर्स आणि ट्वेंटीथ सेंच्युरी फॉक्समध्ये त्यांनी सीईओ म्हणून काम पाहिले आहे. नदीवर तरंगत्या या पार्कच्या एका बाजूला हडसन नदी दिसून येते, तर दुसऱया बाजूला मॅनहॅटन शहर दिसून येते.
या प्रकल्पाची घोषणा 2014 मध्ये झाली होती, पण बॅरींच्या प्रकल्पावरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि नदीतील जीवसृष्टी धोक्यात येणार असल्याचे म्हणत खटला दाखल करण्यात आला होता. 2017 मध्ये वाढता खर्च पाहता प्रकल्पातील सहभाग मागे घेण्याचा विचार त्यांनी चालविला होता. पण अखेर त्यांना या पार्कच्या निर्मितीची मंजुरी मिळाली होती.
बॅरी यांनी याचबरोबर पुढील 10 वर्षांमध्ये या पार्कसाठी 120 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 8 हजार 75 कोटी रुपये गुंतविण्याचे आश्वासन दिले आहे. तेथे केवळ पार्कच नव्हे तर एक आर्टिस्टिक स्पेसही असणार आहे. तेथे अनेक लाइव्ह परफॉर्मन्सही केले जातील. बॅरी यांनी याला आउटडोर नाइटक्लबचे नाव दिले आहे.
हा पार्क लोकांसाठी दररोज सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत खुला राहणार आहे. याचबरोबर संध्याकाळीही पार्क खुले ठेवण्याची घोषणा हडसन रिव्हर पार्क प्रशासन लवकरच करू शकते. येथे म्युझिकल परफॉर्मन्ससह थिएटर आणि डान्स परफॉर्मन्सही होणार आहे. हे ठिकाण केवळ लोकांना चांगला अनुभव देण्यासाठी असल्याचे बॅरी यांनी सांगितले आहे.
-1900 कोटी रुपयांचा खर्च, 2.4 एकरमध्ये फैलावलाय पार्क
-687 आसनांचे थिएटर अन् क्रीडा मैदानाचाही समावेश
-350 प्रजातींची रोपे आणि 65 प्रजातींच्या गवताची लागवड
-132 टय़ुलिपसारख्या स्तंभांवर उभे राहिले पार्क
-66 हजार बल्ब लावण्यात आले, मोठमोठे बेंच बसविले